सातपूरला ६० टक्के मतदान
By Admin | Updated: February 22, 2017 01:06 IST2017-02-22T01:05:49+5:302017-02-22T01:06:07+5:30
महापालिका : विविध कारणांनी निवडणूक गाजली

सातपूरला ६० टक्के मतदान
सातपूर : महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शांततेत सुमारे ६० टक्के मतदान झाले. सातपूर विभागाच्या चार प्रभागातील १ लाख १९ हजार २७९ मतदारांपैकी ७२ हजार १७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६०.५० टक्के मतदान झाले. मात्र, पोलिसांशी झालेले वाद, कथित रोकड जप्त आणि स्थायी समिती सभापती तथा मनसेचे उमेदवार सलीम शेख यांच्या घरी घेण्यात आलेल्या झडतीने निवडणूक चांगलीच गाजली. सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक ८, ९, १० आणि ११ अशा चार प्रभागात मतदान घेण्यात आले. मतदानासाठी एकूण १५४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत सातपूर विभागात अवघे ८.६२ टक्के मतदान झाले होते. ते प्रभाग क्र मांक ११ मधील मतदान केंद्र क्रमांक अग्निशामक दलाच्या कार्यालयात येथे ७७९ पैकी अवघे ७२ मतदारांनी म्हणजेच फक्त ९ टक्के मतदानाची नोंद दुपारी एक वाजेपर्यंत झाली होती. दुपारच्या वेळात संथगतीने मतदान झाले. दुपारनंतर मात्र मतदारांमध्ये उत्साह जाणवला. मतदानाची वेळ संपून गेल्यानंतरही काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदार मतदान करीत होते. प्रभाग क्र मांक ८ मधील २७ हजार ५८७ मतदारांपैकी १७ हजार ३९३ मतदारांनी मतदान केले. या प्रभागात ६३.४० टक्के मतदान झाले आहे. प्रभाग क्र मांक ९ मधील ३० हजार २५३ पैकी १९ हजार ६५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच ६४.९७ टक्के मतदान झाले. सातपूर विभागातील चार प्रभागांत सरासरी ६० टक्के मतदान झाले. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे सातपूर येथील निवडणूक चर्चेत ठरली. सायंकाळी मनपा कार्यालयाजवळ पोलिसांनी एकाएकी येत सौम्य लाठीमार केला. तसेच वाहनातील चाकांच्या हवा सोडल्या. यावेळी येथे उपस्थित माध्यम प्रतिनिधी किशोर वाघ या यांच्याशी अरेरावी केली. या संदर्भात वाघ यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात रीतसर तक्र ार अर्ज दिला आहे़