आमदाराकडून साठ लाख मागितल्याप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: March 11, 2017 02:09 IST2017-03-11T02:09:09+5:302017-03-11T02:09:20+5:30
नाशिक : आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. बाळासाहेब चौधरी यांनी आपल्याकडे याचिका मागे घेण्यासाठी साठ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार हिरे यांनी केली आहे.

आमदाराकडून साठ लाख मागितल्याप्रकरणी गुन्हा
नाशिक : महापालिकेची अभ्यासिका नाममात्र दराने दिल्याच्या विषयावर आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. बाळासाहेब चौधरी ऊर्फ गोपाळ आडगावकर यांनी आपल्याकडे याचिका मागे घेण्यासाठी पन्नास ते साठ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार हिरे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात केली आहे.
महापालिकेच्या मिळकती राजकीय नेत्यांना आणि नगरसेवकांना नाममात्र दरात दिल्याच्या प्रकरणावरून बाळासाहेब चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी नगरसेवक असलेल्या सीमा हिरे यांच्या समर्थ महिला मंडळाला आकाशवाणी केंद्राजवळील अभ्यासिका महापालिकेने चालविण्यासाठी दिली होती. त्या अनुषंघाने ही याचिका दाखल करण्यात आली होती. अॅड. चौधरी यांनी या खटल्यात आपण निवृत्त आयकर अधिकारी नवी दिल्ली तसेच पेशाने वकील असल्याचे प्रतिज्ञापत्रकावर नमूद केले होते. सदरची याचिका अद्यापही न्यायप्रविष्ट आहे.
याचदरम्यान एकाच्या मध्यस्थीने चौधरी यांनी आपल्याकडे जनहित याचिका मागे घेण्यासाठी पन्नास ते साठ लाख रुपयांची मागणी केली, असे सीमा हिरे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान, आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब चौधरी यांचे खरे नाव गोपाळ अनंत अडावदकर असून, त्यांनी वकील असल्याचे सांगून अनेक गरजू आशिलांना फसविले आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी बाळासाहेब अनंत चौधरी ऊर्फ गोपाळ अडावदकर (रा, मंदार सोसायटी, गोळे कॉलनी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)