उद्यान विभागात 6 कोटींचा गोंधळ
By Admin | Updated: July 19, 2014 01:04 IST2014-07-19T00:21:11+5:302014-07-19T01:04:58+5:30
लेखापरीक्षण : चार कोटींच्या कामांची कागदपत्रेच गहाळ

उद्यान विभागात 6 कोटींचा गोंधळ
नाशिक : विनानिविदा कामे देणे आणि अन्य प्रकारांतून उद्यान विभागात तब्बल सहा कोटी ८९ लाख ८३ हजार रुपयांचा गोंधळ झाल्याचे आढळले आहे. स्थानिक लेखापरीक्षणात उद्यान विभागावर हा ठपका ठेवण्यात आला असून, त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळल्याने लोकप्रतिनिधी आता त्यावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.
पालिकेत या आधीही उद्यान विभागाचा कोटेशन घोटाळा गाजला होता. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामे निविदा मागवून न करण्याची गरज असताना तसे झाले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. त्यातच आता आक्षेप आला आहे. महापालिकेचे २०११-१२ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, त्यात या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. अहवाल वर्षात विविध उद्याने आणि बेंचेस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. परंतु उद्यान विभागाने २००७-०८ व २००८-०९ या आर्थिक वर्षात जी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात प्राप्त झालेल्या दरानुसार निवडक मक्तेदारांकडूनच खरेदी करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार अशा प्रकारे मागील निविदांचा विचार केला तर अगोदरच्या दोन वर्षांच्या कालावधीतील निविदांचे दर आणि मक्तेदार विचारात घेतले जाऊ शकतात. शिवाय ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी ही निविदा मागवूनच करणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने खरेदी पद्धत सदोष असल्याचे निष्पन्न झाले असून, महापालिकेने त्यात महापालिकेचे हित जोपासण्यात आले नाही तर दीपक एजन्सी या संस्थेस लाभ करण्याच्या उद्देशाने कृती करण्यात आली. या वर्षभरात खेळणी आणि बेंचेस खरेदीत पालिकेचे दोन कोटी सात लाख ५२ हजार ५४९ रुपयांचे आक्षेपाधिन रक्कम असल्याचे लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सुमारे चार कोटी रुपयांच्या अन्य कामांतील अनेक कामांच्या संचिकाच लेखापरीक्षकांना उपलब्ध करून न देण्यात आल्याने या रकमेवरदेखील आक्षेप घेण्यात आला आहे.
उद्यान विभागाने पाच लाख रुपयांच्या आतील कामे काही विशिष्ट मजूर संस्थांना दिल्याचेही आढळून आले आहे, अशा कामांसाठी कामाची नोंदवहीच ठेवण्यात आलेली नाही. कोणत्या मजूर संस्थेला किती कामे दिली गेली, हे स्पष्ट झाले नाही. इतकेच नव्हे तर विविध मर्यादेचे उल्लंघन करून काम केले किंवा नाही हेदेखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. (प्रतिनिधी)