कांदा लागवडीत ५० हजार हेक्टरची वाढ होणार?
By Admin | Updated: January 11, 2017 01:11 IST2017-01-11T01:11:21+5:302017-01-11T01:11:44+5:30
कांदा रडवणार : आवक वाढण्याची चिन्हे

कांदा लागवडीत ५० हजार हेक्टरची वाढ होणार?
नाशिक : यंदा चांगला पाऊस झाल्याने कांद्याच्या क्षेत्रातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंतच्या कांदा लागवडीवरून दिसून येत आहे. मागील वर्षापेक्षा तब्बल ४० ते ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड वाढण्याची चिन्हे असल्याने या वर्षीही कांदा शेतकऱ्यांना रडविण्याची चिन्हे आहेत. या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. मात्र मागील वर्षभर कांद्याला चांगले दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा अक्षरश: मातीमोल भावाने विकावा लागला आहे. यामुळे यावर्षी चांगला पाऊस होऊनही कांद्याचे क्षेत्रात घट येईल, असे मानले जात होते. खरीप व लेट खरिपाच्या बाबतीत तो अंदाज मात्र खरा ठरताना दिसत आहे. मागील वर्षी लेट खरीप कांद्याचे क्षेत्र ५१ हजार हेक्टरवर होते. यावर्षी मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार ३४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण वर्षभरात नाशिक जिल्ह्णात एक लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर तिन्ही हंगामांतील कांद्याची लागवड झाली होती.
नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत एक तर शेतकरी गहू, हरभरा घेऊ शकतो. परंतु त्याला नगदी पीक म्हणून या काळात दुसऱ्या कोणत्याही पिकाचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शेत रिकामे ठेवण्यापेक्षा कांदा पिकाची लागवड करीत असतो. त्यात यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे विहिरींना पाणीही चांगले आहे. यामुळे शेतकरी कांद्याकडे वळला असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. (प्रतिनिधी)