जनावरे पकडणे पडले महागात भुर्दंड : पालिकेला मिळाले सव्वा लाख, ठेकेदाराला द्यावे लागले पाच लाख
By Admin | Updated: May 27, 2014 01:20 IST2014-05-27T01:01:59+5:302014-05-27T01:20:31+5:30
नाशिक : ठेकेदारामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची योजना महापालिकेला भलतीच महागात पडली असून, पालिकेला दंडापोटी केवळ एक लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले; परंतु ठेकेदाराला मात्र पाच लाख रुपयांचे दान द्यावे लागल्याने ही योजनाच गंुडाळली जाते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

जनावरे पकडणे पडले महागात भुर्दंड : पालिकेला मिळाले सव्वा लाख, ठेकेदाराला द्यावे लागले पाच लाख
नाशिक : ठेकेदारामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची योजना महापालिकेला भलतीच महागात पडली असून, पालिकेला दंडापोटी केवळ एक लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले; परंतु ठेकेदाराला मात्र पाच लाख रुपयांचे दान द्यावे लागल्याने ही योजनाच गंुडाळली जाते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
पंचवटी, रविवार कारंजा, भद्रकाली अशा विविध ठिकाणी मोकाट जनावरांचा उपद्रव खूप वाढला होता. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने शेवटी ही मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यासाठी ठेका देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार विजय सर्व्हिसेस या फर्मला सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर काम देण्यात आले होते. ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांत या ठेकेदारामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. एकूण २१६ जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते. महापालिकेला जनावर मालकांकडून एक लाख १९ हजार रुपये दंडापोटी मिळाले; परंतु जनावरांच्या खाण्यापिण्याचा आणि प्रशासकीय खर्च पालिकेने ठेकेदाराला देण्याची तरतूद असल्याने ठेकेदाराला साडेचार लाख रुपये खाणावळीपोटी झालेला खर्च आणि सहा लाख चार हजार ६०० रुपये प्रशासकीय खर्च ठेकेदाराला द्यावा लागणार आहे. त्यामुळे मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम पालिकेला भलतीच महागात पडली आहे.
नागरिकांचे हित महत्त्वाचे
ही मोहीम महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी राबविली नाही, तर जनावरांना पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्यात येत असल्याने पालिकेने नफातोट्याचा विचार न करता नागरी हिताचा विचार केला आहे.
- रोहिदास बहिरम, उपआयुक्त, अतिक्रमण विभाग