५० खालसेच उरले मुक्कामी
By Admin | Updated: September 22, 2015 00:05 IST2015-09-22T00:05:34+5:302015-09-22T00:05:50+5:30
५० खालसेच उरले मुक्कामी

५० खालसेच उरले मुक्कामी
नाशिक : साधुग्राममध्ये तिसऱ्या पर्वणीनंतर बहुतांश खालशांनी बस्तान गुंडाळले आहे. पावसामुळे खालशांमध्ये पाणी साचल्याने निवासाची परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र सेक्टर एक व दोनमधील बहुतांश ठिकाणी रामकथा, भागवत कथा शुक्रवारपर्यंत असल्याने ५० पेक्षा जास्त खालशांचा मुक्काम कथेच्या समारोपापर्यंत राहणार आहे.
सध्या पावसामुळे साधुग्राममध्ये खालशांनी आवरासावर करण्याला सुरुवात केली आहे. पावसाचे पाणी खालशाच्या मंडपात साचल्याने साधूंसह भक्तगणांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या संततधारेमुळे थांबणे शक्य नसल्याचे सांगत खालशांनी सभा मंडपासह सर्व साहित्य रवाना करण्यास सुरुवात केली आहे.
मात्र रिपरिप पाऊस सुरू असल्याने सभामंडप सोडण्यास अडचणी येत असल्याचे साधूंच्या भक्तांनी सांगितले. कुंभमेळ्यातील तिन्ही पर्वण्या पूर्ण झाल्याने आता साधूंना वापसीचे वेध लागले आहेत. साधूंनी आपल्या खालशातील सामान मिळेल त्या वाहनाने आश्रमात पोहचविण्याला प्राधान्य दिले आहे. सोमवारनंतर कथा काही मोजक्याच खालशांमध्ये सुरू राहणार आहेत.
खालशामधील साधू-महंतांनी तिसऱ्या पर्वणीनंतर आश्रमाकडे धाव घेतल्याने भाविकांची गर्दीही तपोवनात कमी झाली आहे. पर्वणी काळात भाविकांनी गजबजणारी साधुग्रामच्या रस्त्यांवरील वाहतूक कमी झाली आहे. मात्र साधूंच्या खालशात थांबलेले भक्त, भाविकांनी परतण्यासाठीची धावपळ दिसून येत आहे. (प्रतिनिधी)