५० लाखांची मर्यादा, तीन कोटींची खरेदी
By Admin | Updated: July 5, 2015 00:48 IST2015-07-05T00:48:01+5:302015-07-05T00:48:33+5:30
सौर पथदीपांसाठी आता ई-निविदा

५० लाखांची मर्यादा, तीन कोटींची खरेदी
नाशिक : कथित वादग्रस्त चिक्की आणि अग्निशमन विरोधी यंत्र खरेदीचा धडा घेऊन राज्य शासनाने ५० लाखांपुढील कोणत्याही खरेदीला आता ई-निविदा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला करावयाच्या सौर पथदीप योजनांसाठी आता ई-निविदा पद्धत अवलंबवावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याबाबतच्या सूचना कृषी विभागाला दिल्या असून, त्यानुसार येत्या सोमवारी (दि.६) कृषी विभागामार्फत ई-निविदा पद्धतीने याबाबत निविदा मागविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कळते. जिल्हा परिषदेच्या वतीने जयपूर स्थित विन्सेंट सोलर या सौरउर्जेसंबंधित साहित्य उत्पादित करण्यात येणाऱ्या कंपनीला सुमारे तीन कोटी रुपयांचे सौर पथदीप पुरवठा करण्याचा आदेश देण्यात आला होता. या कंपनीने हा पुरवठा ३१ मे २०१५ अखेर करण्याचे बंधन जयपूरस्थित या कंपनीवर टाकण्यात आले होते. प्रत्यक्षात जून संपूनही या कंपनीने सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने या कंपनीचा ठेका रद्द करण्याचे पत्र जिल्हा परिषदेने संबंधित कंपनीला दिले असून, आता सोमवारपासून नव्याने ई-निविदा पद्धत अंवलंबिण्यात येणार आहे. मुळातच या कंपनीची निवड करतानाच विलंब झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पन्नास लाखांच्या आत असलेली कडबाकुट्टी खरेदी मात्र दर करारानेच राबविण्यात येणार असल्याचे समजते. अद्याप कडबाकुट्टी यंत्रांचीही खरेदी करून शेतकऱ्यांना त्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)