नाशिक महापालिकेला शासनाकडून ५० कोटी
By Admin | Updated: May 20, 2016 00:25 IST2016-05-19T22:44:03+5:302016-05-20T00:25:35+5:30
एलबीटी अनुदान : मुद्रांक शुल्क अधिभारही प्राप्त

नाशिक महापालिकेला शासनाकडून ५० कोटी
नाशिक : महापालिकेला एलबीटीपोटी मे महिन्याचे ३१.६४ कोटी रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त झाले असून, त्यातच शासनाने एक टक्का मुद्रांक शुल्कच्या अधिभारापोटीही १७ कोटी ४२ लाखांची रक्कम दिल्याने महापालिकेच्या पदरात घसघशीत ५० कोटी रुपयांचे अनुदान पडले आहे.
शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्दबातल करत त्या मोबदल्यात महापालिकेला दरमहा अनुदान देण्यास १ आॅगस्ट २०१५ पासून सुरुवात केली आहे. महापालिकेला आॅगस्ट ते डिसेंबर २०१५ या कालावधीत दरमहा ४५.८६ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. त्यानंतर महापालिकेने उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठल्याने अनुदानात कपात होऊन ते नंतर पाच कोटीवर आणि पुढे शून्यावर आले होते. आता चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या अनुदानात दरमहा सुमारे १४ कोटी रुपयांची कपात होत आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये ३१.६४ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. आता मे महिन्याचेही ३१.६४ कोटी रुपये अनुदान वितरित करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. याशिवाय, एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी देण्यात येणारी जानेवारी ते मार्च या कालावधीतील रक्कम १७ कोटी ४२ लाख ६८ हजार रुपयांचेही दान महापालिकेच्या झोळीत पडले आहे. विशेष म्हणजे शासनाने मागील फरकाची १ कोटी ९६ लाखांचीही रक्कम महापालिकेला वितरित करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे महापालिकेला एकट्या मे महिन्यातच सुमारे ५० कोटी रुपये हाती पडणार आहेत. याशिवाय, महापालिकेकडून ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीतून मिळणारी वसुली सुरूच असून, ती सुमारे ३२ ते ३५ कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.