जिल्ह्यातील ४९७ विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:16+5:302021-06-09T04:18:16+5:30
नाशिक : विदेशातील युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळालेल्या, मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे तिकडे जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निर्धारित देशात जाण्यासाठी लस ...

जिल्ह्यातील ४९७ विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस
नाशिक : विदेशातील युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळालेल्या, मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे तिकडे जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निर्धारित देशात जाण्यासाठी लस बंधनकारक आहे. तसेच देशविदेशात कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने नाशिकहून विदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या एकूण ४९७ विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग तसेच जिल्हा आणि मनपा प्रशासनाच्या वतीने प्राधान्यक्रमाने लस दिली जात आहे.
नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराशेजारील महात्मा फुले कलादालनात हे लसीकरण केले जात आहे. अमेरिका, युरोप तसेच जगभरातील अन्य कोणत्याही देशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना त्या देशात पोहोचण्यापूर्वीच लसीकरण करणे संबंधित देशांमधील प्रशासनाने बंधनकारक केले आहे. विदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जाणे हा त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. त्यात कोणताही अडथळा येऊ नये, तसेच कुणाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी हा लसीकरणाचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहेे. अमेरिका, युरोपसह बहुसंख्य देशांमध्ये अद्याप तरी कोविशिल्डलाच मान्यता असल्याने सध्या विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लसीचेच डोस दिले जात आहेत. या लसीकरणासाठी ज्या विद्यार्थ्यांना विदेशातील विद्यापीठांनी प्रवेशपत्रे दिली आहेत, केवळ त्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे ॲडमिशन निश्चितीपत्र, आय ट्वेन्टी किंवा डीएस-१६० फॉर्म, आयकार्ड आणि पासपोर्ट परवाना आणल्यासच लसीकरण केले जात आहे.
कोट
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लसीकरण
विदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून मागणी होऊ लागल्याने हे लसीकरण करण्यात येत आहे. त्यात प्रारंभी केवळ १०० विद्यार्थी असतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सोमवारपर्यंत एकूण ४९७ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असून अजून विद्यार्थी असल्यास त्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे.
- गणेश मिसाळ, लसीकरण अधिकारी
-------
कोट
आम्ही मागणी करून संबंधित कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तत्काळ लसीकरणाची पूर्तता करण्यात आली आहे. मला कोणत्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात अमेरिकेला जायचे असल्याने वेळेत मिळालेल्या लसीबद्दल प्रशासनाचे आभार मानतो.
- मानस भालेराव, विद्यार्थी
--------
फोटो (पीएचजेएन ७९) - नोंदणी करून लस घेणाऱ्या विद्यार्थिनी.
फोटो
०७मानस भालेराव