४९२ लेटलतिफांना नोटिसा बजावण्याची कारवाई
By Admin | Updated: November 18, 2014 01:03 IST2014-11-18T01:02:46+5:302014-11-18T01:03:14+5:30
४९२ लेटलतिफांना नोटिसा बजावण्याची कारवाई

४९२ लेटलतिफांना नोटिसा बजावण्याची कारवाई
नाशिक : गेल्या शनिवारी सापडलेल्या ४९२ लेटलतिफांना नोटिसा बजावण्याची कारवाई पूर्ण होत नाही तोच सोमवारी २९२ कर्मचारी पुन्हा वेळेत हजर न झाल्याने त्यांना पालिका प्रशासनाने दणका दिला आहे. या सर्वांना कारणे दाखवा अन्यथा वेतनवाढ बंद अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी तर सबबी सांगणे सुरू केले आहे.महापालिकेच्या मुख्यालयासह बहुतांशी कार्यालये म्हणजे धर्मशाळा झाल्या असून, कर्मचारी आणि अधिकारी केव्हाही येत-जात असल्याने पालिकेच्या कामकाजाचे वेळापत्रकच विस्कळीत होते. पालिकेचे नूतन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम यांनी गेल्या शनिवारी (दि.१५) मुख्यालय, तसेच सर्व विभागीय कार्यालयात अधिकारी पाठवले आणि साडेदहा वाजता सर्व हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले. कामावर येण्याची नियोजित वेळ दहा वाजेची असतानादेखील साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयात न येणाऱ्या ४९२ लेटलतिफांना नोटिसा पाठवून खुलासा मागविण्यात आला. त्यासाठी सोमवारपर्यंतची अंतिम मुदत होती.
दरम्यान, सोमवारी सकाळीही आयुक्तांनी पुन्हा तोच पॅटर्न वापरला. त्यानुसार मुख्यालयात उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, नाशिक पश्चिममध्ये उपआयुक्त विजय पगार, नाशिकरोड विभागात दत्तात्रेय गोतिसे, सातपूरमध्ये सहायक आयुक्त चेतना केरुरे, पूर्व विभागात वसुधा कुरणावळ, सिडको विभागात नितीन नेर, पंचवटीत एस. डी. वाडेकर यांनी साडेदहा वाजेनंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यात महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथील मुख्यालयात सर्वाधिक ६८, त्यानंतर सिडको विभागात ६०, पंचवटी ४४, नाशिकरोड ३९, पूर्व विभाग ३७, सातपूर २१ याप्रमाणे कर्मचारी गैरहजर आढळले त्या सर्वांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर बडगा उगारण्याच्या आयुक्तांच्या कारवाईचे सामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र यापूर्वीही अशी कारवाई झाल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याने यावेळी काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)