४५०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी
By Admin | Updated: September 27, 2016 00:59 IST2016-09-27T00:58:17+5:302016-09-27T00:59:43+5:30
४५०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी

४५०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी
नाशिक : महापालिकेला सन २०१६ - १७ या वर्षासाठी येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत गंगापूर आणि दारणा धरण समूहातील पाण्याबाबतची मागणी पाटबंधारे खात्याकडे नोंदवायची असून, यंदा ४५०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मागील वर्षी कमी पाऊसमान आणि जायकवाडी धरणाला पाणी पळविण्याच्या प्रकारामुळे महापालिकेला पाणीकपातीचा कटू निर्णय घ्यावा लागला होता. मागील वर्षासाठी महापालिकेने ४३०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविली होती, परंतु नंतर पाणीप्रश्नी झालेले राजकारण आणि पाणी पळवापळवीच्या प्रकारामुळे जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातील २७००, तर दारणा धरणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित ठेवले होते. नंतर पाणीप्रश्नाची तीव्रता पाहून जलसंपदा विभागाने अतिरिक्त ३०० दलघफू पाणी आरक्षण गंगापूर धरणातून वाढवून दिले होते.
सदर पाणी महापालिकेने ३१ जुलैपर्यंत पुरविले. यंदा, गंगापूरसह दारणा धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. त्यातच शहराला प्रतिदिन ४०५ ते ४१० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे यंदा ४५०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे. (प्रतिनिधी)