450 जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वाटप
By Admin | Updated: October 6, 2015 23:10 IST2015-10-06T23:09:12+5:302015-10-06T23:10:04+5:30
उपक्रम : विज्ञानच्या १२ विद्यार्थ्यांना दिलासा

450 जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वाटप
नाशिक : विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांमध्ये जाऊन तेथेच विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रमाणपत्र देण्याची समाजकल्याण विभागाच्या उपक्रमाचा लाभ अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना झाला आहे. केटीएएचएम महाविद्यालयातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कमी कालावधित जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे श्रम व वेळेची बचत होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे, असे प्रतिपादन केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.
रावसाहेब थोरात सभागृह येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन अधिकारी खुशाल गायकवाड, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील उपस्थितीत होते.
समाजकल्याण विभागाने राबविलेल्या उपक्रमानुसार थेट जनतेमध्ये जाऊन त्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केटीएचएम महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. जात पडताळणी समितीने राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली असल्याचेही धोंडगे म्हणाले.
याप्रसंगी खुशाल गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनावरील ताण कमी होणार आहे. त्यांना कमी वेळेत प्रमाणपत्र देण्यास आपण कटिबद्ध आहोत. अशा प्रकारचा उपक्रम नाशिकमध्ये प्रथमच राबविण्यात आला असून, नाशिक हे पहिले शहर असल्याचेही गायकवाड म्हणाले. महाविद्यालयातच प्रकरण तपासणी करून वैधता प्रमाणपत्र देणारी नाशिकची समिती एकमेव समिती असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)