४५० विवाहेच्छुकांची नोंदणीवंजारी समाजाचा वधू-वर मेळावा
By Admin | Updated: February 4, 2016 23:45 IST2016-02-04T23:44:22+5:302016-02-04T23:45:40+5:30
४५० विवाहेच्छुकांची नोंदणीवंजारी समाजाचा वधू-वर मेळावा

४५० विवाहेच्छुकांची नोंदणीवंजारी समाजाचा वधू-वर मेळावा
नाशिक : येथील वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने नाशकात आयोजित २३ व्या राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्यात तब्बल ४५० विवाहेच्छुक युवक- युवतींनी नोंदणी केली. औरंगाबादरोडवरील गुरुदत्त लॉन्समध्ये आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन प्रथम आलेल्या पालकाच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष दामोदर गामणे होते.
मेळाव्यासाठी नाशिकसह पुणे, मुंबई, पालघर, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, धुळे, मालेगाव, औरंगाबाद, जालना, गडचिरोली, चंद्रपूर, बीड आदि जिल्ह्यांतून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या पालकांनी मुलांना सोबत आणले आहे, अशा पालकांनाच मेळाव्यात प्रवेश देण्यात आला. यावेळी कुठल्याही प्रकारचे सोपस्कार न घेता भाषणबाजीला फाटा देत थेट विवाहेच्छुक युवक- युवतींच्या परिचयाला सुरुवात करण्यात आली. मेळाव्यात दहा ते बारा जणांचे विवाह जुळण्याच्या मार्गावर आहे. याप्रसंगी संस्थेचे शिवाजी वंजारी, अॅड. नीलेश सानप, देवराम गिते, चंद्रकला साबळे, रवींद्र आखाडे, गुरु दत्त लॉन्सचे संचालक प्रकाश सांगळे, काशीनाथ गामणे, योगेश सानप आदिंसह समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते. नितीन अहेर यांनी विवाहेच्छुकांच्या नावांचे वाचन केले.