लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांसह शहरी आरोग्य केंद्रांमध्ये वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ४४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, एकाच ठिकाणी पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही बदल्यांची प्रक्रिया प्रस्तावित असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.महापालिकेमार्फत नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, सिडकोतील मोरवाडी रुग्णालय तसेच पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय यांसह ३० शहरी आरोग्य केंद्र चालविले जातात. महापालिकेच्या रुग्णालयांसह शहरी आरोग्य केंद्रात वर्षानुवर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. काही वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी ११ ते १५ वर्षांपर्यंत ठाण मांडून आहेत. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय विभागात खांदेपालट झालेली नव्हती. मात्र, आता वैद्यकीय विभागाने पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ४४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, येत्या ७ जुलैपर्यंत सर्वांना त्यांच्या बदलीच्या जागेवर रुजू होण्यास सांगितले आहे. वैद्यकीय विभागाने इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश गरुड यांची बदली बिटको रुग्णालयात तर मोरवाडी रुग्णालयातील डॉ. प्रशांत थेटे यांची बदली कथडा रुग्णालयात करण्यात आली आहे. बिटकोचे डॉ. जयंत फुलकर व कथडाचे डॉ. राजेंद्र भंडारी यांच्याही बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय, विभाग प्रमुखांच्याही बदल्या प्रस्तावित असल्याची माहिती डॉ. डेकाटे यांनी दिली. दरम्यान, पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या मेट्रन, स्टाफनर्स, लॅब टेक्निशियन, फार्मसिस्ट यांच्याही बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
४४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: July 5, 2017 01:07 IST