42 हजार टन द्राक्षांची निर्यात
By Admin | Updated: March 3, 2017 00:21 IST2017-03-03T00:21:34+5:302017-03-03T00:21:49+5:30
निफाड : भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

42 हजार टन द्राक्षांची निर्यात
निफाड : भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. सध्या द्राक्ष हंगाम बहरात असून, निर्यातक्षम द्राक्षांची मागणी युरोप, रशिया आदि देशांत असल्याने यावर्षी २३.७१ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असली तरी निर्यातक्षम द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यंदाच्या द्राक्ष हंगामात विशेषत: महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षाला सुरुवातीला १०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. आता मात्र चिली हा देशही सध्या द्राक्षनिर्यात करीत असल्याने पांढरे द्राक्ष ५० ते ६० रु पये व काळी द्राक्ष ६० ते ७० रुपये सरासरी भावाने निर्यात होत आहे. सुरुवातीला काही निर्यातदारांनी साखर कमी असूनही माल पाठवला. परिणामी तेथील मार्केटमध्ये अपप्रचार होऊन आणि शिवाय चिलीचा माल स्पर्धेत असल्याने अवघ्या ३० दिवसात भाव निम्म्याने खाली आले. युरोपमध्ये तरी भाव सरासरी टिकून आहे. रशियात ते ४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. असे असले तरी मार्चअखेरपर्यंत चिलीचा माल संपेल आणि तपमान असेच वाढत गेले तर द्राक्षांना मागणी वाढून भारतीय द्राक्षाला दरही चांगला मिळेल. मात्र कोणतेही नैसर्गिक संकट या काळात यायला नको, असा आशावाद अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन खापरे यांनी व्यक्त केला. फक्त द्राक्ष उत्पादकांनी घाई न करता संयमाने घ्यावे ८ ते १० दिवसात मार्केटमध्ये पुन्हा तेजी येऊ शकेल.
मागील वर्षी युरोपमध्ये ८४ हजार मे. टन निर्यात झाली होती. आताच्या घडीला ती ४२ हजार १०४ मे.टन इतकी असून, यंदाच्या हंगामात ती ९० हजार मे.टनाच्याही पुढे जाईल असा अंदाज खापरे यांनी व्यक्त केला. साधारणत: युरोप बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक निर्यात रशियामध्ये झाली आहे मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)