दिंडोरी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक
By Admin | Updated: January 9, 2016 22:22 IST2016-01-09T22:21:33+5:302016-01-09T22:22:51+5:30
दिंडोरी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक

दिंडोरी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक
वणी : जुलै ते डिसेंबर २०१६ दरम्यानच्या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रारूप प्रभागरचनेस गुरुवारी (दि.१४) सुरुवात होणार असून, निवडणूक प्रक्रियेच्या प्रथम चरणापासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत अंतिम प्रभागरचना व आरक्षण निर्णय होणार असल्याने दिंडोरी तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले
आहे.
दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक रविवारी (दि. १०) होत असून, या निवडणुकीसाठी अनेक मातब्बरांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रथम नगरसेवक होण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण असताना दिंडोरी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या कार्यकारी मंडळाची मुदत जुलै ते डिसेंबर २०१६ या कालावधीत संपुष्टात येत आहे.
सुमारे एक कोटी रु पयांचे अंदाजपत्रक असणाऱ्या वणी ग्रामपालिकेचा यात समावेश असल्याने इच्छुकांच्या बाहुत स्फुरण चढले आहे. १४ जानेवारी रोजी प्रारूप प्रभागरचना, १९ जानेवारीला संबंधित अधिकाऱ्यांकडून मान्यता, २७ला सोडत पद्धतीने आरक्षण, २८ पासून सूचना व हरकती मागविणे, ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत, १८ फेब्रुवारीपर्यंत प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय, २६ फेब्रुवारीला अंतिम प्रभागरचना व आरक्षण असा निवडणुकीचा सर्व तपशील प्रसिद्ध करण्यात येणार
आहे.
दरम्यान, दिंडोरी नगरपंचायतीनंतर पुन्हा दिंडोरी तालुक्यातील राजकीय रणधुमाळी यानिमित्ताने सुरू होणार असल्याने ४१ ग्रामपंचायतींच्या कार्यकक्षेतील राजकीय वातावरण गरम झाले आहे. (वार्ताहर)