मतदारयादीत ४० हजार नवीन मतदार विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:11+5:302021-08-27T04:19:11+5:30

नाशिक : मतदार यादी पुनर्रीक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या पडताळणी मोहिमेत ४० हजार ९९९ नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत, ...

40,000 new voters in the electoral roll | मतदारयादीत ४० हजार नवीन मतदार विराजमान

मतदारयादीत ४० हजार नवीन मतदार विराजमान

नाशिक : मतदार यादी पुनर्रीक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या पडताळणी मोहिमेत ४० हजार ९९९ नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत, तर दुबार, मृत आढळून आलेली सुमारे ५४ हजार नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेतून यादी अधिकाधिक शुद्ध झाली असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

मतदार यादी पुनर्रीक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया असून, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पडताळणी मोहीम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत दि. १ जानेवारी ते ५ ऑगस्ट या कालावधीत ५४ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. मतदार यादीत दोनदा आढळून आलेली नावे, तसेच मतदार मृत झाल्यानंतरही त्यांची नावे यादीत कायम होती अशी सर्व नावे वगळण्यात आली आहेत. एकीकडे सुमारे ५३ हजार नावे वगळण्यात आली असली तरी मतदार यादीत ४० हजार ९९९ नवमतदारांची भरदेखील पडली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारीपासून निवडणूक शाखेकडून यादी शुद्धिकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार राबविण्यात आलेल्या मोहिमेत दुबार नावे वगळण्याबरोबरच नवमतदारांच्या नोंदणीला प्राधान्य देण्यात आले होते. मतदार यादीतील मतदारांची दुबार नावे रद्द करणे याबरोबरच मतदारांचे नाव, पत्ता यात काही दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करणे, या मोहिमेत अनेकांच्या मागणीनुसार मतदारसंघ बदल करण्यात आले. बीएलओंनी मतदारांच्या घरोघरी भेट देत तपासणी व पडताळणी करून मोहीम राबविण्यात आली. मतदार यादीत शंभर टक्के मतदारांच्या छायाचित्रांचा समावेशदेखील करण्यात आला आहे.

मतदार यादीतून दुबार व मृत नावे वगळावी यासाठी फाॅर्म ७ भरण्यात आला होता, तर घरभेटीत मतदार संबंधित पत्त्यावर आढळून न आल्याने त्यांचीही नावे वगळण्यात आली. त्यानुसार निवडणूक शाखेने पडताळणी करीत मतदार यादीतून ५४ हजार नावे वगळली आहेत. तसेच १ जानेवारी ते ५ ऑगस्ट या कालावधीत ४० हजार ९९९ नवमतदारांची नोंदणी झाली. यासाठी मतदारांना आवाहन करण्यात आले होेते. मतदारसंघनिहाय मतदारांना यादीतील बदलाबाबतची संधी देण्यात आली होती. ज्यांना छायाचित्र जमा करावयाचे आहे किंवा नावात, पत्त्यात बदल करावयाचा असेल त्यांना रीतसर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

--इन्फाो--

नवीन मतदार केंद्राची आवश्यकता नाही

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १५०० मतदारांमागे एक मतदान केंद्र उभारले जाते. त्यानुसार मतदार यादी पडताळणीनुसार आता जिल्ह्यात नवीन मतदार केंद्र उघडण्याची आवश्यकता राहिलेली नाही. मतदार नोंदणीमुळे यादीत जवळपास ४१ हजार मतदारांची भर पडली. मात्र, ५४ हजार नावे वगळण्यात आली. त्यामुळे नवीन मतदान केंद्र उभारण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

Web Title: 40,000 new voters in the electoral roll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.