४० हजार ग्राहक नोंदणीपुस्तकाविना
By Admin | Updated: July 1, 2016 00:06 IST2016-07-01T00:02:45+5:302016-07-01T00:06:33+5:30
कागदच नाहीत : परिवहन कार्यालयाची दिरंगाई

४० हजार ग्राहक नोंदणीपुस्तकाविना
इंदिरानगर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या सहा महिन्यांपासून वाहनांचे नोंदणीपुस्तक देण्यात आले नसल्याने सुमारे ४० हजार ग्राहकांना नोंदणीपुस्तकाची प्रतीक्षा आहे. प्रादेशिक परिवहन विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रतीक्षेतील ग्राहकांची संख्या वाढतच असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता नोंदणीपुस्तकांसाठी लागणारा छपाईचा कागदच उपलब्ध नसल्याने नोंदणी रखडली असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना गेल्या सहा महिन्यांपासून वाहन नोंदणीपुस्तकाची प्रतीक्षा आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नोंदणीच दिली जात नसल्याने शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी छपाईचा कागद नसल्याचे उत्तर दिले. गेल्या सहा महिन्यांपासून कागदांची कमतरता आहे, तर मग इतके दिवस काय कारवाई केली याची कोणतीही माहिती मात्र येथील अधिकारी देऊ शकले नसल्याचे समजते.
वाहनधारकांना नोंदणीपुस्तक मिळत नसल्याने या संदर्भात शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांना निवेदन देण्यात आले. येत्या पंधरा दिवसांत नोंदणीचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नोंदणीपुस्तकाविना वाहन चालविताना वाहतूक शाखेकडून वाहनधारकांना अडविले जाते. शिवाय त्याला नाहक दंडाची पावती भरावी लागते. यामुळे वाहनधारक अडचणीत सापडला आहे.
नोंदणीपुस्तक मिळत नाही तोपर्यंत विमा कंपन्यांकडून विम्याची कारवाई करण्यास नकार दिला जात आहे. या साऱ्या प्रकारामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तातडीने नोंदणीपुस्तक देण्याची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय गायकर, सरचिटणीस नाना पाटील, प्रकाश चिमोटे, सागर ठाकरे, दीपक ताकाटे, मनोज उदावंत, प्रकाश चौधरी, अतिश जाधव, शशी शिंदे आदिंनी केली आहे. (वार्ताहर)