४० हजार येवलेकरांचा मोर्चात सहभाग
By Admin | Updated: September 25, 2016 00:10 IST2016-09-25T00:10:08+5:302016-09-25T00:10:28+5:30
४० हजार येवलेकरांचा मोर्चात सहभाग

४० हजार येवलेकरांचा मोर्चात सहभाग
येवला : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ नाशिक येथे निघालेल्या मराठा क्र ांती मूक मोर्चासाठी येवल्यातून २१५० पेक्षा अधिक वाहनांमधून सुमारे ४० हजार मराठा समाजबांधवांसह या मोर्चास पाठिंबा देणारे इतर आठ ते दहा समाजाचे नागरिक सहभागी झाले.
मोर्चात सहभागी होण्यासाठी शनिवारी पहाटेपासूनच येवला-विंचूर चौफुली परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वैयक्तिक वाहनातून जाऊन अनेकांनी मोर्चात सहभाग नोंदवला शिवाय येवल्यातून शिवसेना नेते संभाजी पवार, अॅड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा कार्यकर्त्यांच्या वाहतुकीसाठी खुला करून दिला होता. जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांनी स्वखर्चाने आपल्या जगदंबा एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या ३५ गाड्या मोर्चातील कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिल्या. येवल्यातून निघालेल्या सर्व वाहनांच्या नोंदी विंचूर गावातील चौफुलीवर घेतल्या जात होत्या. पवार, शिंदे, बनकर, हे स्वत: या चौफुलीवर उभे राहून मोर्चासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत गाड्यांच्या नंबरसह नोंदी घेत असतानाचे चित्र दिसले. आडगाव मुरमीसह तालुक्यातील अनेक गावांतील युवक कार्यकर्ते स्वत:च्या दुचाकीला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज लावून नाशिकला गेले. येथील सहारा हॉटेलचे मालक ऋ षिकेश पाटील, शशिकांत पाटील यांनी येवला तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी पुरी-भाजीची पाकिटे रस्त्यात वाटली. येवल्यापासून सायखेड्यापर्यंत कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. येवला-विंचूर चौफुलीवर दुतर्फा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज लावण्यात आले होते. येवल्यातून महिला स्वतंत्र गाड्यांतून मोर्चात सहभागी झाल्या होत्या. महिलांनीही डोक्यावर भगव्या टोप्या घातल्या होत्या. येवला ते सायखेडा दरम्यानच्या वाटेत केवळ मोर्चात सहभागी होणाऱ्या गाड्याच रस्त्यावर होत्या. दरम्यान, येवला ते सायखेडा फाट्यापर्यंत एकतफर् ी जाणाऱ्या गाड्यांच्या रांगा दिसत होत्या.जिल्ह्यातून प्रचंड मराठा जनसमुदाय लोटल्याने येवल्याच्या अनेक वाहनांना व कार्यकर्त्यांना नांदूर नाक्यावर गाड्या थांबवाव्या लागल्या.