४ हजार ९२३ डाॅक्टर, ६८८ नर्सेस रुग्णसेवेसाठी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:11+5:302021-04-30T04:18:11+5:30
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ४ हजार ९२३ डाॅक्टर व ६८८ नर्सेस रुग्ण सेवेकरिता उपलब्ध झाले ...

४ हजार ९२३ डाॅक्टर, ६८८ नर्सेस रुग्णसेवेसाठी उपलब्ध
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ४ हजार ९२३ डाॅक्टर व ६८८ नर्सेस रुग्ण सेवेकरिता उपलब्ध झाले आहेत. विद्यापीठाचा हिवाळी सत्र - २०२०मधील वैद्यकीय व बी.एस्सी नर्सिंग अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला असून, वैद्यकीय विद्याशाखेच्या अंतिम वर्षात ९४.०६ टक्के विद्यार्थी तसेच बेसीक बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाचे ७८.५९ टक्के, तर पोस्ट बी.एस्सी. अभ्यासक्रमाचे ५६.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. कालिदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या निर्देशानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष कोविड प्रशिक्षणही घेण्यात आले आहे, कोविड-१९ संदर्भात आरोग्य सेवा देण्यासाठी नवीन डाॅक्टरांची व नर्सेस यांची आरोग्य यंत्रणेला मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हिवाळी सत्र -२०२० मधील अंतिम वर्षाचा वैद्यकीय व बी.एस्सी नर्सिंग विद्याशाखेचा पदवी अभ्यासक्रमाचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. ही अंतिम वर्षाची परीक्षा ८ मार्च ते २५ एप्रिल २०२१ या कालवधीत घेण्यात आली होती.
कोट-
हिवाळी सत्र- २०२० मध्ये अंतिम वर्ष वैद्यकीय विद्याशाखा परीक्षेसाठी ५,२३४ परीक्षार्थी होते. यापैकी ४,९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अंतिम वर्षाच्या परीक्षा संपल्यानंतर केवळ एका दिवसातच विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात आला असून, संबंधित विद्यार्थ्यांना एक वर्षाचा अंतरवासीयता अभ्यासक्रम करावा लागणार आहे. अंतरवासीयता अभ्यासक्रमात ते कोविड रुग्णसेवा करू शकणार आहेत.
- अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
इन्फो-
नर्सिंग उत्तीर्ण विद्यार्थी थेट सेवेसाठी पात्र
अंतिम वर्ष बेसिक बी.एस्सी नर्सिंग विद्याशाखेसाठी ७०९ परीक्षार्थी होते. यापैकी ५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर पोस्ट बेसिक बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम परीक्षेसाठी २५२ परीक्षार्थी होते. त्यातील १४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यापीठाकडून नर्सिंग परीक्षांचा निकाल हा परीक्षा संपल्यानंतर केवळ आठ दिवसांतच जाहीर करण्यात आला असून, या विद्यार्थ्यांना अंतरवासीयता अभ्यासक्रम लागू नसल्याने उत्तीर्ण विद्यार्थी हे शासकीय अथवा खासगी सेवेत रुजू होण्यासाठी पात्र ठरणार असल्याची विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.