मरणानंतर स्मशानातही द्यावे लागतात ४ ते ५ हजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST2021-04-18T04:13:57+5:302021-04-18T04:13:57+5:30
नाशिक : नाशिक महानगरपालिकेने नाशिकच्या सर्व स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठीची लाकडे, रॉकेल असे सर्व साहित्य मोफत ठेवलेले असतानाही नागरिकांना बहुतांश स्मशानभूमीत ...

मरणानंतर स्मशानातही द्यावे लागतात ४ ते ५ हजार !
नाशिक : नाशिक महानगरपालिकेने नाशिकच्या सर्व स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठीची लाकडे, रॉकेल असे सर्व साहित्य मोफत ठेवलेले असतानाही नागरिकांना बहुतांश स्मशानभूमीत किमान ४ ते ५ हजार रुपये दिल्याशिवाय मृतदेहच स्वीकारले जात नसल्याचा अनुभव येत आहे. ठेकेदाराची माणसे लाकडेच काढून देत नसल्याने अखेरीस मृतांचे कुटुंबीय नाईलाजास्तव रक्कम देऊन विधी आटोपत असले तरी गोरगरिबांना तर मृतदेह जाळण्यासाठीदेखील या ठेकेदारांच्या माणसांकडे गयावया करावी लागत आहे.
नाशिकच्या सर्व विभागांतील अमरधाम आणि स्मशानभूमींमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आढळून येत आहे. काही स्मशानभूमीत ५ हजार तर काही ठिकाणी ४ हजार रुपये मागत असल्याचे अनुभव नागरिकांना आले आहेत. अनेकदा तर पैसे देऊनही नागरिकांना झटपट आवरा अशा शब्दातील ठेकेदारांच्या कामगारांचे रुबाब ऐकून घेण्याची वेळ येते. सध्याच्या काळात कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह तर गुंडाळूनच आणलेले असतात. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी या ठेकेदारांचे कामगार तर पैसे घेतच आहेत. अशा प्रकारांमध्ये नातेवाईकदेखील ही बाब समजून घेऊन कामगारांना त्यांच्या मागणीनुसार रक्कम देतात. मात्र, ज्या नागरिकांचे निधन केवळ वृद्धापकाळाने झाले आहे, अशा नागरिकांचा देह रॅपरमध्ये गुंडाळलेला नसूनदेखील तसेच त्यांच्या निधनाचे तसे प्रमाणपत्र समवेत असूनही अनेक नागरिकांना अशा सामान्य अंत्यसंस्कारासाठी रक्कम माेजावी लागत असल्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. आधीच कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाने शोकाकुल झालेल्या नागरिकाला स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी लाच द्यावी लागत असल्याने त्यांचा संताप अनावर होत आहे.
इन्फो
बेड नसल्याने जमिनीवरच अंत्यसंस्कार
शहरात दररोज वाढत चाललेल्या कोरोना मृत्युसंख्येसह अन्य सामान्य मृत्युमुळे अमरधाममध्ये तर अनेकदा नागरिकांना अग्निडाग देण्यासाठीचे बेडदेखील उपलब्ध होत नाहीत. मग स्मशानातीलच जमिनीवरील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार उरकून घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
कोट
आनंदवलीतील स्मशानभूमीत पैसे घेणाऱ्यांना रोखले
आनंदवलीतील स्मशानभूमीत सामान्य नागरिकाच्या निधनानंतर ४ हजार रुपये मागितले होते. मी तिथेच असल्याने संबंधित कामगाराला जाब विचारला. अखेर त्याला महानगरपालिकेच्या नियमाची आठवण योग्य शब्दात करुन दिल्यानंतरच त्यांनी अंत्यसंस्कार केले.
संतोष गायकवाड, नगरसेवक