लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्याने या धर्तीवर आंध्र प्रदेशात योजना राबविण्याचे तेथील प्रशासनाने ठरविले आहे. त्यासाठी तेथील शासनाने ४० लोकांची एक समिती ३८ गाव योजना पाहणी करण्यासाठी पाठविली होती. या समितीने मंगळवारी येथे भेट देऊन संपूर्ण योजनेची पाहणी करून माहिती घेतली.मागील आर्थिक वर्षात जागतिक बँकेने संपूर्ण देशात सामूहिक पाणीपुरवठा योजनांचा सर्व्हे केला होता. त्यात भारतातील तीन योजना आग्रक्र माने निवडण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन आणि नफ्यात असलेली येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा ही एकमेव योजना असल्याने देशातील सर्वोकृष्ट पाणीपुरवठा योजना ठरली होती. महाराष्ट्रासह इतर राज्यातही अनेक गाव मिळून चालविल्या जाणाऱ्या अनेक पाणी योजना अस्तित्वात आहेत. परंतु सर्वत्र योजना बंद असल्याचेच उदाहरण पहायला मिळते. विशाखपट्टणम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ए. आप्पाराव, कृषी सभापती के. दामोधरराव, जिल्हा परिषद सदस्य गंगा भवानी, जल संधारणाचे उपअभियंता ए. सावित्री, शाखा अभियंता के. रामास्वामी व राज्यातील ठरावीक सरपंच यांचेसह ४० सदस्य या समितीत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता बाभूळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रास समितीने भेट दिली. त्यानंतर अनकाई येथील एमबीआर येथे भेट दिली. त्यानंतर अनकुटे येथे प्रत्येक घरी भेट देऊन योजनेचे पाणी कसे पोहचते आणि वसुली कशी केली जाते, याविषयी माहिती जाणून घेतली.आंध्र प्रदेश राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने अशा प्रकारच्या योजनांचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु योजना चालविल्यास त्यावरील खर्च जास्त होतो व कालांतराने योजना बंद पडते. त्यामुळे महाराष्ट्रात प्रयोगीक तत्वावर स्थानिक समितीमार्फत चालविण्यात आलेली व यशस्वी असलेली ही एकमेव योजना असल्याने आंध्र प्रदेश शासनाने सदर समितीस अभ्यास दौऱ्यासाठी येवला येथे पाठविले आहे. ३८ गाव पाणी पुरवठा समितीचे पाणी वितरण, पाणी पट्टी वसुली व कामाचे नियोजन पाहुन अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या समितीने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ३८ गाव पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, शिवसेना नेते संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, गटविकास अधिकारी सुनील अहीरे, कांतीलाल साळवे, प्रविण गायकवाड, विठ्ठल आठशेरे, बाळासाहेब गुंड, भाऊसाहेब गरु ड, सुनील आहिरे, गणेशा, अशोक बिन्नर, उत्तम घुले, प्रमोद तक्ते, सतीश बागुल, एस.एम.गणेशे, जिजाबाई गायकवाड, बापूसाहेब गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
आंध्र प्रदेशच्या समितीकडून ३८ गाव योजनेची पाहणी
By admin | Updated: July 5, 2017 00:21 IST