घरफोडीतील ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: June 25, 2015 00:25 IST2015-06-25T00:24:50+5:302015-06-25T00:25:06+5:30
गुन्हे शाखेची कामगिरी : सोन्याच्या दागिन्यांसह साडेसात लाखांची रोकड जप्त

घरफोडीतील ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक : गंगापूररोडवरील रामेश्वरनगरमध्ये दहा दिवसांपूर्वी झालेल्या लाखो रुपयांच्या घरफोडीचा गुन्हे शाखेने छडा लावला आहे़ या गुन्ह्यातील प्रमुख संशयित संजय ऊर्फ संतोष राजबर (उत्तर प्रदेश), राजू स्वामी ऊर्फ डॉक्टर (चेन्नई) व सराफ व्यवसायिक नंदू बोराडे (देवळाली) या तिघांना अटक करण्यात आली असून संशयित गणेश मारुती भंडारे (नाशिक) फरार आहे़ अटक केलेल्या तिघांकडून ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी पत्रकार परिषदेत दिली़
यमुनाकृपा बंगल्यातील नीरव दिलीप पजवानी हे वडिलांच्या वाढदिवसासाठी बाहेर गेले होते़ संशयित राजबर व भंडारे यांनी या बंगल्याच्या खिडकीचे गज वाकवून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व आठ लाख रुपये रोख अशी सुमारे ४० लाखांची घरफोडी केली़ सुरुवातीला गंगापूर पोलीस ठाण्यात केवळ ६० हजारांच्या घरफोडीची फिर्याद देण्यात आली होती़; मात्र पजवानी कुटुंबीय परतल्यानंतर दीड किलो सोन्याचे दागिने व आठ लाख रुपये चोरी गेल्याचे समोर आले़
घरफोडीचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युनिट दोन व तीनकडे वेगवेगळ्या टीम करून उत्तर प्रदेश व चेन्नईकडे रवाना केल्या़ यातील प्रमुख संशयित संजय ऊर्फ संतोष राजबर यास कुशीनगरमधून तर राजू स्वामी यास चेन्नईतून ताब्यात घेतले़ तर चोरीचे सोने विकत घेणाऱ्या नंदू बोराडे याला देवळाली कॅम्पमधून अटक करण्यात आली व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले़ (प्रतिनिधी)