आठ तासांत ३३३ अतिक्रमणे जमीनदोस्त

By Admin | Updated: January 9, 2017 01:47 IST2017-01-09T01:47:41+5:302017-01-09T01:47:54+5:30

भंगार बाजार : दोन दिवसांत ४२७ अनधिकृत गुदामांवर बुलडोझर; विना अडथळा पार पडली मोहिम

333 encroachable landslides in eight hours | आठ तासांत ३३३ अतिक्रमणे जमीनदोस्त

आठ तासांत ३३३ अतिक्रमणे जमीनदोस्त

नाशिक : अवैध धंदे व गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारातील वादग्रस्त भंगार बाजार अतिक्रमण निर्मूलन मोहीम दुसऱ्या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्तात युद्धपातळीवर महापालिकेने राबविली. आठ तासांत ३३३ अनधिकृत भंगारमालाची गुदामे व दुकानांवर बुलडोझर फिरविण्यात आला.
सुमारे चाळीस एकर क्षेत्रावर व अडीच किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला भंगार बाजार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने भुईसपाट करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारपासून (दि.७) महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी ९४ अनधिकृत गुदामे पालिकेने उद्ध्वस्त केली तर रविवारी (दि.८) आठ तासांमध्ये ३३३ गुदामे भुईसपाट करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेप्रसंगी कुठलाही अडथळा पालिका कर्मचाऱ्यांना निर्माण झाला नाही. कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त असल्यामुळे भंगार व्यावसायिकांनी मोहिमेला विरोध करण्याचे धाडस केले नाही.
बारा पोकलॅन, २१ जेसीबी (बुलडोझर) यंत्रे सातपूर-अंबड लिंकरोडच्या दोन्ही बाजूस दिवसभर भंगार बाजारावर चालविण्यात आले. अनधिकृत भंगारमालाची गुदामे या यंत्रांद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये पत्र्याच्या गुदामांचे मजबूत शेड, सीमेंट कॉँक्रीटची पक्की बांधकाम केलेली गुदामे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेस्तनाबूत केली. पहिल्या दिवशी ९४ अतिक्रमणे हटविण्यात पालिकेला यश आले होते; मात्र दुसऱ्या दिवशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे ३३३ अनधिकृत अतिक्रमणे हटविली. सोमवारी सकाळी पुन्हा मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: 333 encroachable landslides in eight hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.