गणेश विसर्जनासाठी ३३ ठिकाणे निश्चित
By Admin | Updated: September 3, 2014 00:24 IST2014-09-02T22:04:34+5:302014-09-03T00:24:13+5:30
गणेश विसर्जनासाठी ३३ ठिकाणे निश्चित

गणेश विसर्जनासाठी ३३ ठिकाणे निश्चित
नाशिक : गणेश प्रतिष्ठापनेनंतर प्रशासनाला आता विसर्जनाच्या तयारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे पालिकेने विविध सहा विभागांत ३३ ठिकाणे निश्चित झाली आहेत. गणेशभक्तांनी अधिकृत ठिकाणीच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात लहान-मोठी सुमारे सव्वा हजार गणेश मंडळे असून, त्यांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी करतानाच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासह अन्य सुविधा दिल्या आहेत. आता अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनाचे आव्हान प्रशासनासमोर आहे. येत्या ८ तारखेला विसर्जन होणार आहे. शहरात चौक मंडई येथून मुख्य विसर्जन मिरवणूक निघते. त्याचबरोबर नाशिकरोड येथेही विसर्जन मिरवणूक निघत असते. सिडको, सातपूर, पंचवटी येथे मिरवणुका निघत नसल्या तरी सार्वजनिक गणेश मंडळे वाजतगाजत गणेश विसर्जन करण्यासाठी येत असतात. घरगुती गणेशोत्सव साजरा करणारे नागरिकही विसर्जन करण्यासाठी शहरातील चार नद्यांच्या काठी जात असतात. त्यामुळे कोठेही विसर्जन करण्याऐवजी पालिकेनेच अधिकृत ठिकाणे निश्चित केली असून, तेथेच विसर्जन करावे, अशी महापालिकेची भूमिका आहे. त्याठिकाणी जीवरक्षक दल, कृत्रिम तलाव, निर्माल्य कलश अशा विविध सुविधाही दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
अशी आहेत ठिकाणे
नाशिक पूर्व : टाळकुटेश्वर पटांगण, खंडोबा पटांगण, रोकडोबा पटांगण, रामदास स्वामीमठ आगर टाकळी, शिवाजीवाडी नासर्डी पूल, मोदकेश्वर पटांगण.
नाशिक पश्चिम : गोदापार्क, फॉरेस्ट नर्सरी पूल, एकमुखी दत्त मंदिर, सिध्देश्वर मंदिर, हनुमान घाट, म्हसोबा मंदिर (उंटवाडी)
सातपूर : नासर्ही पुलाखालील बाजू, गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, आनंदवली, आसारामबापू पूल.
सिडको : आयटीआय पूल
पंचवटी : रामकुंड, यशवंतराव महाराज पटांगण, लक्ष्मणकुंड, खंडेराव पटांगण, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, तपोवन, नांदूर मानूर, सीता सरोवर (म्हसरूळ), जॉगिंग ट्रॅक (रामवाडी)
नाशिकरोड : गोदावरी नदी (पंचक), चेहडी गाव (दारणा नदी), देवळाली गाव (वालदेवी नदी), देवळाली गाव ईदगाह जवळ तसेच वडनेर पंपिंग जवळ.