घोटीच्या शनैश्चर पतसंस्थेत ३३ लाखांचा अपहार

By Admin | Updated: July 4, 2016 22:49 IST2016-07-04T22:47:18+5:302016-07-04T22:49:04+5:30

संशयित फरार : व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल

33 lakh apes in Ghati's Shankarchera Credit Society | घोटीच्या शनैश्चर पतसंस्थेत ३३ लाखांचा अपहार

घोटीच्या शनैश्चर पतसंस्थेत ३३ लाखांचा अपहार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील शनेश्चर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत बनावट सोने तारण कर्ज प्रकरण तयार करून ३३ लाख रुपयांचा अपहार संस्थेचे व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी केल्याचा ठपका संस्थेने ठेवला आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात संबधित व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटी येथील शनेश्चर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अफरातफर झाल्याची तक्रार येताच इगतपुरीच्या सहाय्यक निबंधकानी गतवर्षी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली होती. संस्थेचे प्राधिकृत अधिकारी तथा उपलेखापाल परीक्षक संजीव शिंदे यांनी आज घोटी पोलीस ठाण्यात व्यवस्थापकाविरु द्ध फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, संतोष शंकर शिंदे, रा. घोटी हे १९९७ पासून ते १८ फेबु्रवारी २०१६ या कालावधीत संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने संचालक, ठेवीदार, सभासद, कर्जदार यांना संपूर्णपणे अंधारात ठेवत आपल्या पदाचा गैरवापर करत, आपल्या स्वत:च्या फायद्याकरिता बनावट तेवीस कर्जदारांच्या नावे कर्ज तयार करून त्याच्या नावे खाते उघडून बनावट सोने तारण कर्ज प्रकरण तयार करत, सोने मूल्यांकनापेक्षा जादा रक्कमेचे कर्ज देऊन, रोखीने रक्कम नावे टाकून सोने तारण कर्जाचा मुद्दल ३२ लाख ७९ हजार रुपये तसेच मूल्याकनापेक्षा जादा रकमेचे कर्ज यातील मुद्दल २५ हजार ८३७ रुपये असा एकूण ३३ लाख चार हजार ८३७ रु पये रक्कमेचा अपहार केला.
घोटी पोलिसांनी प्राधिकृत अधिकारी संजीव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यवस्थापक संतोष शंकर शिंदे यांच्याविरुद्ध भादंवि कलम प्रमाणे घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कर्जदारांच्या नावे टाकलेली रक्कम मंजुरीपेक्षा जादा टाकत असल्याची बाब उघड झाल्याने व सोने तारण कर्जदार व्यक्तीची नावे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर अफरातफरीचा तपास विभागीय पोलीस अधिकारी घोगरे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलेश बच्छाव या प्रकरणाचा तपास करीत आहे.(वार्ताहर)

Web Title: 33 lakh apes in Ghati's Shankarchera Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.