३१४ वृक्ष तोडण्यास परवानगी
By Admin | Updated: February 6, 2016 23:41 IST2016-02-06T23:39:01+5:302016-02-06T23:41:09+5:30
महापालिका : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकास दहा वृक्षलागवडीची अट

३१४ वृक्ष तोडण्यास परवानगी
नाशिक : महापालिका क्षेत्रातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर द्वारका सर्कल ते दत्तमंदिर चौक आणि सिन्नर फाटा ते दारणा नदीपर्यंत दुतर्फा असलेले तब्बल ३१४ वृक्ष काही अटी-शर्तींवर तोडण्याची परवानगी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली. या वृक्षतोडीच्या बदल्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला एकास दहा वृक्षलागवड करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची सभा अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी झालेल्या चर्चेत नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव असल्याने द्वारका सर्कल ते दत्तमंदिर चौक या दरम्यानचे ७८ वृक्ष आणि सिन्नर फाटा ते दारणा नदीपर्यंतचे २३६ वृक्ष तोडण्याची परवानगी काही अटी-शर्तींवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला देण्यात आली. तसेच द्वारका सर्कल ते दत्तमंदिर चौक या दरम्यानच्या १९ वृक्षांचा विस्तार कमी करण्यासही मान्यता देण्यात आली. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने एकास दहा यानुसार वृक्षांची लागवड करायची असून सदर वृक्ष हे दहा फुटाच्या वरील असले पाहिजे. शिवाय त्या वृक्षांचे पाच वर्षे देखभाल व संवर्धन महामार्ग प्राधिकरणने करावे, असे आदेशित करण्यात आले.
बैठकीत काही वृक्षतोडीचेही विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने, पश्चिम विभागातील संभाजीनगर येथील उद्यानाच्या भिंतीलगत असलेले दोन वाळलेले वृक्ष, सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील एक वृक्ष, परिसरातील सहा धोकादायक वृक्ष, नाशिक-पुणे रोडवरील आशीर्वाद स्टॉपसमोरील २४ वृक्ष, नवश्या गणपतीनगर येथील एक वृक्ष तोडीचा प्रस्ताव होता. परंतु सदर वृक्षांची पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. मनपाच्या मालकीच्या वृक्षांना योग्य आकार देण्यासाठी छाटणीची परवानगी देण्याचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्याचाही विषय बैठकीत ठेवण्यात आला होता; परंतु सदर प्रस्ताव फेटाळून लावण्यात येऊन प्राधिकरणच त्यावर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला सदस्य प्रा. कुणाल वाघ, परशराम वाघेरे, संजय चव्हाण, संजय साबळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)