३१ हजार शेतकऱ्यांची पीकविम्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:33+5:302021-09-04T04:19:33+5:30

नाशिक: पीक विम्याचे कवच असूनही शेतकऱ्यांची निराशा झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसते. गत वर्षीच्या तुलनेत ...

31,000 farmers turn to crop insurance | ३१ हजार शेतकऱ्यांची पीकविम्याकडे पाठ

३१ हजार शेतकऱ्यांची पीकविम्याकडे पाठ

नाशिक: पीक विम्याचे कवच असूनही शेतकऱ्यांची निराशा झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसते. गत वर्षीच्या तुलनेत जवळपास ३१ हजार शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा उतरविलेला नाही. मागीलवर्षी खरीप हंगाम २०२० या कालावधीत दोन लाख ७२ हजार ३६४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. यंदा काहीसा निरूत्साह दिसून आला.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसला तर त्यांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी त्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी विमा उतरविला जातो; मात्र ज्या अपेक्षेने विमा उतरविण्यात आला, त्याचा फारसा लाभ झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविण्यासाठी फारसा उत्साह दाखविलेला दिसत नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेतून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३१ हजारांनी संख्येत घट झाली असून, १ लाख ४० हजार शेतकऱ्यांनीच विमा कवच घेतले आहे.

कोरेानाचे संकट त्यातच निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला असताना शेतकऱ्यांना पीक विम्याची अपेक्षा होती. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत असताना शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडले नाही. ज्यांना थोडाफार लाभ झाला त्यांच्यातही अन्याय झाल्याची भावना आहे. या अविश्वासाच्या वातावरणाचा परिणाम यंदा पीक विम्यावर झाल्याचे दिसते. कोरोना संकटामुळे मागील वर्षी शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला, तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले; मात्र अपेक्षित भरपाई त्यांना मिळू शकली नाही.

यंदा पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ४० हजार ५७१ इतकी असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लाख ३१ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये एकूण ३६५ प्रस्ताव कंपनीला सादर करण्यात आले. त्यापैकी २५५ प्रस्ताव मंजूर झाले. तर ५१ प्रस्ताव नामंजूर झाले. १६ प्रस्ताव फेरपडताळणीसाठी विमा कंपनीला सूचित करण्यात आले आहे. यंदा पीक विम्यासाठी शासनाकडून अावाहन करण्यात येऊनही अपेक्षित शेतकऱ्यांनी या याेजनेत सहभाग घेतल्याचे दिसत नाही.

Web Title: 31,000 farmers turn to crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.