महसूल वसुलीसाठी ३१ क्रशर सील
By Admin | Updated: March 27, 2017 00:17 IST2017-03-27T00:16:54+5:302017-03-27T00:17:07+5:30
नाशिक : मार्च अखेरच्या शासकीय वसुलीसाठी नाशिक तहसील कार्यालयाने तालुक्यातील सारूळ व राजूर बहुला येथील ३१ क्रशर सील करून गौणखनिज व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला

महसूल वसुलीसाठी ३१ क्रशर सील
नाशिक : मार्च अखेरच्या शासकीय वसुलीसाठी नाशिक तहसील कार्यालयाने तालुक्यातील सारूळ व राजूर बहुला येथील ३१ क्रशर सील करून गौणखनिज व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला असून, दोन दिवस क्रशर बंद पडल्याने संबंधितांनी तातडीने सव्वापाच कोटी रुपयांचा भरणा शासकीय तिजोरीत केला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस विविध शासकीय कार्यालयांकडून शासकीय वसुलीला प्राधान्य देण्यात आले असून, नाशिक तहसील कार्यालयाने यापूर्वीच शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड, महात्मानगर आदि मध्यवर्ती भागात रहिवास क्षेत्रात वाणिज्य वापर करणाऱ्या जागा मालकांविरुद्ध मोहीम हाती घेऊन जागा वापरात बदल केल्याबद्दल दंडाच्या नोटिसा बजावून कोट्यवधी रुपयांची वसुली केली आहे. त्याच धर्तीवर सारूळ व राजूर बहुला या ठिकाणी असलेल्या खाणी व क्रशर मालकांनाही अगोदर नोटिसा बजावून त्यांनी उपसा केलेल्या गौणखनिजाच्या प्रमाणात स्वामीत्वधन (रॉयल्टी) भरण्याचे आदेश दिले होते, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी दोन दिवसांपूर्वी धडक मोहीम हाती घेऊन सर्व क्रशर सील केले. त्यामुळे क्रशरचालकांची धावपळ उडाली. (प्रतिनिधी)