सुरगाण्यात कोट्यवधीच्या धान्याचा काळाबाजार तीस हजार क्विंटलचा अपहार
By Admin | Updated: January 28, 2015 01:57 IST2015-01-28T01:42:05+5:302015-01-28T01:57:20+5:30
गुदाम निरीक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा

सुरगाण्यात कोट्यवधीच्या धान्याचा काळाबाजार तीस हजार क्विंटलचा अपहार
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या रेशनच्या सुमारे तीस हजार क्विंटल धान्याचा धान्य वाहतूकदार व गुदामपालाने संगनमत करून अपहार केल्याची बाब गुदाम तपासणीत उघडकीस आली असून, यासंदर्भात सुरगाणा पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुंबईहून आलेल्या तपासणी पथकाने या साऱ्या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधल्यानंतरच प्रशासनाला जाग आल्याचे स्पष्ट झाल्याने, दरमहा स्थानिक यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या गुदाम तपासणीबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्यात मुंबईच्या भरारी पथकाने जिल्'ातील सर्वच धान्य गुदामांच्या केलेल्या तपासणीत नाशिकरोड येथील गुदामाच्या कारभाराबाबही संशय घेतला जाऊन काही दिवस ते सील करण्यात आले होते. त्यानंतर सुरगाणा येथील धान्य गुदामाच्या तपासणीत हा अपहार उघडकीस आला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीत मनमाडच्या अन्नधान्य महामंडळातून वाहतूक ठेकेदाराने उचललेले धान्य व सुरगाणा येथील शासकीय धान्य गुदामात प्रत्यक्ष प्राप्त झालेले लाभार्थींना वाटलेले धान्य याचा कोठेही ताळमेळ बसत नसल्याचे तपासणी पथकाला आढळून आले होते.