गोदाघाटावर ३०० जीवरक्षक तैनात
By Admin | Updated: August 23, 2015 23:50 IST2015-08-23T23:49:54+5:302015-08-23T23:50:18+5:30
सेवापर्वणी : भारत सेवाश्रम संघाचा उपक्र

गोदाघाटावर ३०० जीवरक्षक तैनात
मनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध सामाजिक संस्था, संघटना उपक्रम राबवित आहेत. त्यात भारत सेवाश्रम संघाने रुग्णांना मोफत उपचारासह भाविकांचे पुरासारख्या आपत्ती परिस्थितीत प्राण वाचविण्यासाठी ३०० जीवरक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती संघाचे महामंत्री स्वामी विश्वात्मानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात पाण्यात बुडणाऱ्या ४५ भाविकांचे जीव वाचविण्यात संघाच्या जीवरक्षक स्वयंसेवकांना यश आले होते. तसेच पंढरपूरला संघाच्या जीवरक्षकांनी ३७०० भाविकांचे प्राण वाचविले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संघातर्फे नियुक्त करण्यात आलेले जीवरक्षक समुद्रात पोहणारे असून, ते पूर्ण प्रशिक्षित असतात. २० सप्टेंबरपर्यंत सदर संघाचे जीवरक्षक घाटावर सेवा देणार आहेत. सध्या संस्थानचे ३५० स्वयंसेवक याठिकाणी येऊन पोहचले आहेत. १०० वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघ सेवेचे कार्य करीत आहे. सन १९१७ मध्ये स्वामी प्रणवानंद यांनी संघाची स्थापना केली. सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रण स्वयंसेवकही संघातर्फे रात्रं-दिवस असणार आहेत. पूर, वादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीत संघाचे स्वयंसेवक सदैव तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विश्वशांती महायज्ञास प्रारंभ झाला आहे. सकाळी पूजन करून स्वामी माधवानंद महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच या संघाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी स्वामी भास्करानंद यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.