पंचवटीत ३० आजी - माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात
By Admin | Updated: January 10, 2017 01:17 IST2017-01-10T01:17:38+5:302017-01-10T01:17:50+5:30
समोरासमोर निवडणूक लढविण्याची शक्यता

पंचवटीत ३० आजी - माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात
संदीप झिरवाळ पंचवटी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पंचवटी विभागातील प्रत्येक प्रभागात आजी-माजी असे एक ते दोन लोकप्रतिनिधी इच्छुक असल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात जवळपास ३० आजी-माजी नगरसेवक उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही प्रभागांत दोन विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर ठाकणार आहेत.
पंचवटीत पूर्वी बारा प्रभाग होते. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य याप्रमाणे २४ लोकप्रतिनिधी होते. नवीन प्रभाग रचनेनुसार आता चार जागांचा एक प्रभाग झाल्याने पंचवटीत सदस्य संख्या पूर्वीप्रमाणेच २४ असून, सहा प्रभाग झाले आहे. पंचवटी विभागात सध्या शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस असे २४ नगरसेवक आहेत.
विद्यमान लोकप्रतिनिधींमध्ये सध्या विद्यमान महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, अॅड. राहुल ढिकले, रंजना भानसी, उद्धव निमसे, लता टिळे, ज्योती गांगुर्डे, समाधान जाधव, कविता कर्डक, विमल पाटील, मनीषा हेकरे, दामोदर मानकर, परशराम वाघेरे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, तर माजी नगरसेवकात अरुण पवार, अॅड. जे. टी. शिंदे, सुरेश खेताडे, उल्हास धनवटे, भगवान भोगे, शरद सानप, कमलेश बोडके, संजय बागुल, पुंडलिक खोडे, डॉ. जगन्नाथ तांदळे, रुक्मिणी कर्डक, हरिभाऊ लासुरे हेदेखिल निवडणुकीत नशीब आजमाविणार आहेत. विद्यमान नगरसेवकात गणेश चव्हाण हे पत्नीला, तर डॉ. विशाल घोलप हे आईला, मीना माळोदे यांचे पती, तर फुलावती बोडके यांच्याऐवजी त्यांचे पुत्र माजी नगरसेवक कमलेश बोडके, रूपाली गावंड यांचे पती हेमंत शेट्टी असे निवडणूक रिंगणात आहे. पंचवटीत जवळपास दीड डझनपेक्षा अधिक विद्यमान, तर डझनभर माजी नगरसेवक असे ३० आजी-माजी लोकप्रतिनिधी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.