‘श्रीं’च्या विसर्जनासाठी ३० कृत्रिम तलाव
By Admin | Updated: September 23, 2015 23:44 IST2015-09-23T23:44:32+5:302015-09-23T23:44:53+5:30
पालिकेची तयारी : मूर्ती व निर्माल्य संकलनाचीही स्वतंत्र व्यवस्था

‘श्रीं’च्या विसर्जनासाठी ३० कृत्रिम तलाव
नाशिक : शहरात गणेशोत्सवातील उत्साह आता शिगेला पोहोचला असून मंडळांनी साकारलेले देखावे-आरास पाहण्यासाठी भाविकांच्या गर्दीने रस्ते ओसंडून वाहताना दिसून येत आहेत. दरम्यान, येत्या रविवारी अनंतचतुर्दशीला श्रींच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील सहाही विभागात एकूण ५८ ठिकाणे निश्चित केली असून त्याठिकाणी आवश्यक ती सुविधा पुरविली जाणार आहे. याचबरोबर ३० ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार असून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे.
महापालिकेने गणरायाच्या विसर्जनासाठी संबंधित विभागांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून त्यादृष्टीने कामांना सुरुवात झाली आहे. एकूण ५८ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात कृत्रिम तलावांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रामुख्याने सिडको विभागात डे केअर स्कूल, गोविंदनगर सामाजिक सभागृह, राजे संभाजी स्टेडियम, अश्विननगर, नाशिक पश्चिम विभागात चोपडा लॉन्स पूल, चव्हाण कॉलनी गोदापार्क जॉगिंग ट्रॅकजवळ, फॉरेस्ट नर्सरी पूल गंगापूररोड, दोंदे पूल उंटवाडीरोड, येवलेकर मळा बॅडमिंटन हॉल, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, पंडित कॉलनीत लायन्स क्लब मैदान, सातपूर विभागात पाइपलाइनरोड रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ, विस्डम हायस्कूल रामेश्वरनगर, अशोकनगर पोलिस चौकी आणि शिवाजीनगर सूर्या मॉर्फी चौक, नाशिकरोड विभागात मनपा शाळा क्रमांक १२५ मुक्तिधाममागे, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी जयभवानी रोड, इंदिरा गांधी पुतळ्याजवळ नारायणबापू चौक, पंचवटी विभागात कोणार्कनगर गणेश मार्केट, गोपाळनगर, वाघाडी, आरटीओ कॉर्नर पेठरोड, गोरक्षनगर दिंडोरीरोड, राजमाता मंगल कार्यालय वाघाडी नदी, दत्तचौक किशोर सूर्यवंशी मार्ग आणि नाशिक पूर्व विभाग रामदास स्वामीनगर बस स्टॉप, साईनाथनगर चौफुली, किशोरनगर व राणेनगर याठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. याशिवाय पारंपरिक पद्धतीने गोदाघाट परिसरात विसर्जनाची व्यवस्था राहणार आहे.