पालिकेचे २८०० खटले प्रलंबित
By Admin | Updated: October 30, 2014 00:19 IST2014-10-30T00:14:14+5:302014-10-30T00:19:27+5:30
निकालाची प्रतीक्षा : अधिकाऱ्यांच्या केवळ फेऱ्या

पालिकेचे २८०० खटले प्रलंबित
नाशिक : महापालिकेशी संबंधित तब्बल २८०० खटले विविध न्यायालयांत दाखल असून, दावे निकाली निघत नसल्याने अनेक अडचणी उद्भवत आहेत. तथापि, ज्या खात्यांशी संबंधित खटले आहेत, त्या खातेप्रमुखांनी तातडीने आवश्यक त्या पूर्तता करून वकिलांमार्फत पाठपुरावा करण्याच्या सूचना आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी दिल्या आहेत.
मनपाच्या खातेप्रमुखांची बैठक आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी घेतली. विविध खात्यांचा आढावा घेतल जात असताना विधी अधिकारी बी. यू. मोरे यांनी पालिकेशी संबंधित २८०० खटले विविध न्यायालयांत दाखल करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ६११ खटले उच्च न्यायालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांनी ज्या खात्यांशी संबंधित खटले प्रलंबित आहेत, त्या खात्यांच्या प्रमुखांनी आवश्यक त्या पूर्तता करून वकिलामार्फत आपल्या विभागाचे खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. दुसरीकडे उच्च न्यायालयातील खटल्यांचा प्रगती अहवाल सादर करण्यास सांगतानाच, संबंधित खटल्यांचा पाठपुरावा खातेप्रमुखांबरोबरच आपण स्वत: करू, असे स्पष्ट केले.
पालिकेच्या विरोधात दाखल होणारे खटले मोठ्या प्रमाणात असून, पालिकेच्या बाजूने निकाल लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वकिलांना कामगिरीनिहाय कामे देण्याची चर्चा यापूर्वी झाली होती. त्यामुळे आता आयुक्त पोंक्षे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)