२७५ अपक्ष निवडणूक रिंगणात
By Admin | Updated: February 17, 2017 23:36 IST2017-02-17T23:36:07+5:302017-02-17T23:36:25+5:30
आठ नगरसेवकांचा समावेश : तेरा माजी नगरसेवकांना वेध

२७५ अपक्ष निवडणूक रिंगणात
नाशिक : चार सदस्यीय प्रभाग रचना आणि प्रभागाची मोठी व्याप्ती लक्षात घेता यंदा महापालिका निवडणुकीत अपक्षांची संख्या घटणार, असा दावा केला जात असताना तब्बल २७५ अपक्षांनी उमेदवारी करत सदर दावा फोल ठरविला आहे. अपक्षांमध्ये आठ विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून, तेरा माजी नगरसेवकांनीही ‘एकला चलो रे’चा नारा लगावत पुन्हा पालिकेत पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहिले आहे.
महापालिका निवडणुकीत यंदा एकूण ८२१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यात राष्ट्रीय पक्षांचे २६२, राज्यस्तरीय पक्षांचे २२१, छोट्या पक्षांचे ६३ तर तब्बल २७५ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यंदा राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणावर नाराजी समोर आल्याने बंडखोरी झालेली आहे. त्यातूनच काही उमेदवारांनी मिळेल त्या राजकीय पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेतली, परंतु अनेकांना अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अपक्षांमध्ये बव्हंशी हौशे-नवशेही आहेत. परंतु, आठ विद्ममान नगरसेवक अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा अपक्ष निवडून आले होते. त्यातील दामोदर मानकर यांना भाजपाची उमेदवारी मिळाली आहे, तर अन्य अपक्ष नगरसेवक उपमहापौर गुरुमित बग्गा, रशिदा शेख, संजय चव्हाण व पवन पवार हे पुन्हा एकदा अपक्ष लढत आहेत. याशिवाय, कॉँग्रेसच्या नगरसेवक विमल पाटील, नाशिकरोड भागात पाच महिन्यांपूर्वीच पोटनिवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या मंदा ढिकले, राष्ट्रवादीचे नगरसेवक हरिष भडांगे, मनसेतून सेनेत गेलेले अरविंद शेळके हेसुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. विद्ममान नगरसेवकांबरोबरच १३ माजी नगरसेवकांनीही अपक्ष उमेदवारी करत नशीब अजमावणे ठरविले आहे. त्यात रुक्मिणी कर्डक, भगवान भोगे, मधुकर हिंगमिरे, राजेंद्र नागरे, सुरेश पाटील, सविता गायकवाड, वंदना मनचंदा, रमेश जाधव, सुशीला खरोटे, संजय अढांगळे, सतीश खैरनार, शोभा दोंदे यांचा समावेश आहे. माजी नगरसेवक गोटीराम वरघडे यांच्या पत्नी जिजाबाई वरघडे, माजी महापौर दशरथ पाटील यांचे सुपुत्र प्रेम पाटील, माजी नगरसेवक नंदू जाधव यांच्या पत्नी रेखा जाधव, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांच्या पत्नी सीमा बागुल, माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्या पत्नी अरुणा दातीर हेसुद्धा नशीब अजमावत आहे.
कुठे आघाडी, कुठे एकला चलो रे...
महापालिका निवडणुकीत काही अपक्षांनी एकत्र येत आपल्या प्रभागात आघाडी केली आहे. त्यात प्रामुख्याने, प्रभाग ५ मध्ये उपमहापौर गुरुमित बग्गा, कॉँग्रेसच्या विमल पाटील, मनसेचे उल्हास धनवटे व नंदिनी बोडके यांनी आघाडी करत एकत्र प्रचार चालविला आहे. तर प्रभाग ३० मध्ये संजय चव्हाण, शेख रशिदा यांचा एबी फॉर्मचा घोळ झाल्याने त्यांना शिवसेनेने पुरस्कृत केले असले तरी ते अपक्ष म्हणूनच लढत देत आहेत. प्रभाग ४ मध्येही भगवान भोगे यांच्याबाबतीत तशीच स्थिती आहे.
विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक अपक्ष म्हणून लढत देत असताना अन्य अपक्षांनी मात्र आपापल्या स्तरावर प्रचार चालविला आहे. त्यातील बव्हंशी अपक्षांमागे कार्यकर्त्यांचे पाठबळ नसल्याने त्यांची अवस्था बिकट आहे.