रेकॉर्डवरील २७५ फरार गुन्हेगारांना अटक

By Admin | Updated: February 4, 2017 23:56 IST2017-02-04T23:56:30+5:302017-02-04T23:56:51+5:30

नाशिक परिक्षेत्र : नाशिक ग्रामीणचा प्रथम क्रमांक : सर्वाधिक फरार गुन्हेगारांचा शोध

275 absconding criminals arrested on record | रेकॉर्डवरील २७५ फरार गुन्हेगारांना अटक

रेकॉर्डवरील २७५ फरार गुन्हेगारांना अटक

नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या पंधरा दिवसीय रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार शोधमोहिमेत २७५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे़ यामध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील संशयितांचा समावेश आहे़ नाशिक ग्रामीण पोलीस दलाने रेकॉर्डवरील १३१ फरार गुन्हेगार पकडून परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे़  आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून १५ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान परिक्षेत्रातील (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर) पाचही जिल्ह्यांत रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार विशेष शोध मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत सर्वाधिक गुन्हेगारांना अटक करून न्यायालयात हजर करणाऱ्या जिल्ह्यास बक्षिसाचीही घोषणा करण्यात आली होती़  या मोहिमेसाठी नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकाची स्थापना केली होती़ या पथकांनी पंधरा दिवसांत तब्बल २७५ रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारांना अटक केली आहे़ त्यामध्ये १३१ असे सर्वाधिक फरार गुन्हेगारांना अटक करून नाशिक ग्रामीण पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावला आहे़ दुसरा क्रमांक अहमदनगर व तृतीय क्रमांक जळगाव जिल्ह्याने पटकावला आहे़ यातील काही गुन्हेगार हे २० ते २५ वर्षांपासून फरार होते़ तर सराईत गुन्हेगारांमध्ये दरोड्यातील खुुर्च्या सरबित चव्हाण (रा़ लक्ष्मीनगर, कोपरगाव), फसवणुकीतील धुडकू आनंदा मोहिते, राजेंद्र धुडकू मोहिते (रा़ नामपूर, सटाणा), बलात्काराच्या गुन्ह्यातील गोरख झाल्टे, मधुकर झाल्टे (रा़ मातुलठाण, ता़ येवला), दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील जितेंद्र पखाले ऊर्फ शिवराम गाडे यांचा समावेश आहे़ नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केलेले बहुतांशी गुन्हेगार हे जिल्ह्यात तसेच परजिल्ह्यात नावे बदलून, पेहराव बदलून तर काही जण साधुगिरी करून राहात होते़ ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व सहकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक चौबे यांनी अभिनंदन केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 275 absconding criminals arrested on record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.