फटाक्यांच्या स्टॉल्समधून २७ लाखांचा महसूल
By Admin | Updated: November 4, 2015 22:34 IST2015-11-04T22:34:07+5:302015-11-04T22:34:41+5:30
फटाक्यांच्या स्टॉल्समधून २७ लाखांचा महसूल

फटाक्यांच्या स्टॉल्समधून २७ लाखांचा महसूल
नाशिक : महापालिकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या स्टॉल्सच्या लिलावातून २७ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त केला असून, २१५ पैकी १६१ स्टॉल्सला विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला आहे. उर्वरित स्टॉल्सचा लिलाव तहकूब ठेवण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.
महापालिकेने पोलिसांच्या परवानगीनुसार शहरातील सुमारे २१५ ठिकाणी फटाक्यांच्या स्टॉल्सकरिता लिलावप्रक्रिया राबविली. यावेळी १६१ स्टॉल्सला विक्रेत्यांचा प्रतिसाद लाभला. नाशिकरोडमधील जेलरोड, के. एन. केला हायस्कूलजवळील स्टॉल्सला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला. मागील वर्षी महापालिकेने १५३ स्टॉल्सच्या लिलावाच्या माध्यमातून २१ लाख ५१ हजारांचा महसूल प्राप्त केला होता. यंदा १६१ स्टॉल्सच्या माध्यमातून २७ लाख ६१ हजारांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ६ लाख १० हजार महसूल जास्त मिळाला आहे. दरम्यान, डोंगरे वसतिगृह मैदानावर नाशिक फटाका असोसिएशनने स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी मागितली असून, अग्निशामक दलाच्या परवानगीनंतर त्यांनाही परवानगी दिली जाणार आहे.