- दिनेश पाठक
नाशिक : नाशिकसह राज्यातील अनेक भागात मागच्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला असून, पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले आहेत. २४ जिल्ह्यांतील ११० तालुक्यांमध्ये २६ ते २७ हजार एकरांवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. पुढच्या चार-पाच दिवसांत आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.
पीक विम्याचे पुनर्गठन करण्यात येत असून, सरकार लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय घेईल, असे देखील कोकाटे म्हणाले. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा इशारा दिला हाेता. शुक्रवारी (दि.४) काही भागातच पाऊस झाला तर मागच्या दोन दिवसांत मात्र ११० तालुक्यांत पावसाने कहर केला. आपत्ती व्यवस्थापन विभागाशी माझी आजच भरपाईबाबत काय करता येईल, याविषयीची चर्चा झाली असून, यात जिरायती पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.
बाकीचे पालकमंत्री तर सहा महिने भेटत नाहीतआपण नंदुरबारचे पालकमंत्री असताना तेथे दोन महिन्यांपासून गेलेले नाहीत, असे विचारल्यावर माणिकराव कोकाटे म्हणाले की, ‘अहो बाकीचे काही पालकमंत्री तर सहा सहा महिने त्या जिल्ह्यात जात नाहीत. मी तर दोन महिन्यांपूर्वीच तेथे जाऊन आलो. मी तेथे जात नसलो तरी अधिकारी, तेथील लोकप्रतिनिधींशी कामांबाबत चर्चा होत असते.