२६ उमेदवारांची अनामत जप्त

By Admin | Updated: February 28, 2017 00:44 IST2017-02-28T00:44:07+5:302017-02-28T00:44:21+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत २६ पैकी राष्ट्रवादीवगळता विविध राष्ट्रीय पक्षांच्या पंधरा मातब्बर उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली आहे.

26 candidates confiscation | २६ उमेदवारांची अनामत जप्त

२६ उमेदवारांची अनामत जप्त

सटाणा : बागलाण तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत २६ पैकी राष्ट्रवादीवगळता विविध राष्ट्रीय पक्षांच्या पंधरा मातब्बर उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली आहे.
बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटात षष्ठरंगी लढत रंगली होती. निवडणुकीच्या दोन महिने आधीच आदिवासी नेत्यांनी एकत्र येत आदिवासी विकास आघाडी स्थापन करून माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे पुत्र गणेश यांना आघाडीची उमेदवारी जाहीर केली होती, तर आदिवासींच्या या लढ्यात राष्ट्रवादीने तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हातात गड राखण्याची जबाबदारी दिली होती. या धर्मयुद्धात भाजपाने संघ परिवारातील आदिवासी आरोग्यसेवक मन्साराम गावित यांना, तर बहुजन समाज पार्टीने माजी पोलीस हवालदार शिवदास सोनवणे यांना उमेदवारी बहाल केली होती. गटाबाहेरील मुल्हेरचे उपसरपंच सुभाष येवला व संजय देशमुख यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली. परंतु अखेरच्या चरणात गणेश अहिरे आणि संजय सोनवणे यांच्यातील सरळ लढतीत गणेश अहिरे यांनी ३५३० मतांची आघाडी घेत विजय मिळविला. मात्र चुरशीच्या लढतीत चीत झालेले राष्ट्रवादीचे संजय सोनवणे वगळता सर्वांची अनामत जप्त झाली. याच गटात समाविष्ट असलेल्या मानूर गणातील भास्कर गांगुर्डे या भाजपाच्या उमेदवारालाही अनामत सांभाळता आली नाही. तब्बल चार ते साडेचार दशके दीर्घकाळ सत्ता राहिलेल्या कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात उमेदवारांची अनामत जप्त होऊन अक्षरश: कचरा झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
वीरगाव गट हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या एक दशकापासून या गटावर कॉँग्रेसची राजवट होती. सत्ता राखण्यासाठी बागलाण पंचायत समितीच्या पहिल्या महिला सभापती सीताबाई बागुल यांना पाचारण करून श्रेष्ठींनी त्यांना तिकीट दिले. मात्र संपर्काचा अभाव, ढिसाळ प्रचारयंत्रणा यामुळे हजाराचा आकडादेखील त्या पार करू शकल्या नाही. त्यांच्यावरही अनामत गमवण्याची वेळ आली. कंधाणे गणातील याच पक्षाच्या उमेदवार अवघे ३८३ मते मिळाली. त्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली. नामपूर गटात र्कांग्रेसला शरद पवार या नावाची बडी हस्ती गळाला लागली होती. याच गटातील अपक्ष उमेदवार निवृत्ती देवराम पवार, रमेश रामचंद्र पवार यांचीही अनामत जप्त झाली.
जायखेडा गटात राष्ट्रवादीचे यतीन पगार यांनी तालुक्यात सर्वाधिक ६३३६ इतके मते मिळवून सर्वांना धक्काच दिला. त्यांना अपक्ष डॉ. नविलसंग खैरनार यांनी एकाकी झुंज दिली. या लढाईत कॉँग्रेस, भाजपा, सेना यांना पराभूत केले. या लढाईत शिवसेनेचे शरद देवरे यांना मात्र पाचशेचा आकडादेखील पार करता न आल्यामुळे त्यांच्यावर अनामत जप्तीची नामुष्की ओढावली. देवरे यांच्या गणातील शिलेदारांची तीच अवस्था आहे. जायखेडा गणातील ललिता देवीदास भामरे व आसखेडा गणातील प्रवीण कौतिक अहिरे यांनादेखील अनामत सांभाळता आली नाही. या गणातील गणेश कौतिक सूर्यवंशी या अपक्ष उमेदवाराची अनामत जप्त झाली. याच गटात भाजपाचे उमेदवार व नामपूर हे आपले होमग्राउंड सोडून जायखेडा गटात नशीब आजमावण्यासाठी आलेले डॉक्टर सी. एन पाटील याांनादेखील अनामत वाचवता आली नाही. मुंजवाड गणात माजी पंचायत समिती सदस्य संजय गरुड अपक्ष म्हणून नशीब आजमावत होते. परंतु ते कमनशिबी ठरले. त्यांच्यासह नरेंद्र खरे यांची अनामत जप्त झाली, तर ब्राह्मणगाव गणात धर्मा पारखे यांना अनामत गमवावी लागली. वीरगाव गटात आदर्शगाव किकवारीच्या सरपंच मंजुळाबाई जहागीरदार या सेनेच्या उमेदवार यांचीही अनामत जप्त झाली. त्यांच्या शिलेदार कंधाणे गणातील सेनेच्या उमेदवार प्रमिला गावित यांचीही अशीच अवस्था झाली. नामपूर गटात मनसेचे डॉ. राजराम अहिरे यांच्यासह नामपूर गणातील त्याच्या शिलेदार हेमांगी चौधरी तालुक्यातील एकमेव मनसेने गट व गणात दिलेल्या दोघांची अनामत जप्त झाली आहे.

Web Title: 26 candidates confiscation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.