जिल्ह्यात २५३ मतदान केंद्रे संवेदनशील
By Admin | Updated: February 21, 2017 01:50 IST2017-02-21T01:50:02+5:302017-02-21T01:50:19+5:30
१५ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश

जिल्ह्यात २५३ मतदान केंद्रे संवेदनशील
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मंगळवारी (२१) २६४६ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. त्यातील २५३ मतदान केंद्रे ही संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यातील १५ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असून, त्यात सुरगाणा तालुक्यात १३, तर निफाड तालुक्यात २ मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्णात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने पंधरा तालुक्यांतील ३०० मतदान केंद्रे ही आदर्शवत तयार केली आहेत. या मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प, निवारा शेड, तसेच इतर सोयी-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका शांततेत तसेच पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने निवडणुकांसाठी तयारी केली आहे. मागील महिन्यात प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी देत सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली होती. मालेगाव येथील नुकत्याच झालेल्या गोरक्षा समिती पदाधिकारी मारहाणीच्या घटनेनंतर मालेगावमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. संवदेनशील व अतिसंवेदनशील मतदार केंद्रांवर राखीव पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)