मनपाच्या अ‍ॅप्सवर महिनाभरात २५०० तक्रारी

By Admin | Updated: October 17, 2015 23:41 IST2015-10-17T23:38:51+5:302015-10-17T23:41:25+5:30

१६०० तक्रारींचा निपटारा : विद्युत विभागाच्या सर्वाधिक तक्रारी

2500 complaints per month for municipal apps | मनपाच्या अ‍ॅप्सवर महिनाभरात २५०० तक्रारी

मनपाच्या अ‍ॅप्सवर महिनाभरात २५०० तक्रारी

मनपाच्या अ‍ॅप्सवर महिनाभरात २५०० तक्रारी१६०० तक्रारींचा निपटारा : विद्युत विभागाच्या सर्वाधिक तक्रारीनाशिक : महानगरपालिकेने महिनाभरापूर्वी दि. १५ सप्टेंबरला स्मार्ट नाशिक मोबाइल अ‍ॅप्सचे लोकार्पण केल्यानंतर सुमारे २५०० तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यातील १६०० तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी विद्युत विभागाच्या असून, त्याखालोखाल आरोग्य आणि बांधकाम विभागाशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. महिनाभरात १४ हजार २५० नागरिकांनी मनपाचे मोबाइल अ‍ॅप्स डाऊनलोड केल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.
नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने आॅनलाइन तक्रारींची सुविधा अधिक अद्ययावत करण्यासाठी स्मार्ट नाशिक मोबाइल अ‍ॅप्स विकसित करण्यात आले. महापालिकेचे संगणक विभागाचे प्रमुख प्रशांत मगर यांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अवघ्या ७० हजार रुपयांत विकसित करण्यात आलेल्या या मोबाइल अ‍ॅप्सचे लोकार्पण मागील महिन्यात १५ सप्टेंबरला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महिनाभरात शहरातील १४ हजार २५० नागरिकांनी स्मार्ट नाशिक अ‍ॅप्स डाऊनलोड केले असून, सुमारे २५०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १६०० तक्रारींचा निपटारा करण्यात आला, तर सुमारे ८०० तक्रारी प्रलंबित आहेत. प्राप्त तक्रारींमध्ये सर्वाधिक ९०४ तक्रारी विद्युत विभागाच्या आहेत. त्याखालोखाल बांधकाम विभागाच्या ३३०, आरोग्य विभागाच्या ४७५ तर पाणीपुरवठा विभागाच्या २५० तक्रारींचा समावेश आहे. १०८ नागरिकांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा तक्रारी नोंदविल्या आहेत. तक्रारी नोंदवल्यानंतर सदर तक्रार संबंधित विभागाकडे पाठवताना आणि तिचे निराकरण झाल्यानंतर तसा एसएमएस तक्रारदारांना पाठविला जात असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, महापालिकेने याच मोबाइल अ‍ॅप्सवर सामाजिक बांधीलकी म्हणून रक्तदात्यांचीही सूची मोबाइल क्रमांक व रक्तगटनिहाय दिली आहे. आतापर्यंत ९०७ रक्तदात्यांनी या सूचीत आपला सहभाग नोंदविला आहे.
 

तक्रारी क्लोज : तक्रारदारांचा आक्षेप

महापालिकेच्या मोबाइल अ‍ॅप्सवर नागरिकांकडून धोरणात्मक निर्णयाशी संबंधित तक्रारी होत असल्याने त्यांचा निकाल लावताना खातेप्रमुखांची अडचण होताना दिसून येत आहे. त्यामुळे सदर तक्रारी खातेप्रमुखांकडून ‘क्लोज’ केल्या जात आहेत. मात्र, त्याची कारणमीमांसा दिली जात नाही. त्यामुळे तक्रारींचा निपटारा करण्याऐवजी त्या ‘क्लोज’ म्हणून दाखविल्या जात असल्याने तक्रारदारांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळेच अनेक तक्रारदारांकडून अ‍ॅप्सवर पुन्हा पुन्हा त्याच तक्रारींचा पाठपुरावा केला जात आहे. महापालिकेने किमान सदर तक्रारी धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असतील, तर त्या खातेप्रमुखांनी नोंदवून घेत पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: 2500 complaints per month for municipal apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.