२२३ ग्रामसेवकांना २५ हजारांचा दंड
By Admin | Updated: August 23, 2016 00:19 IST2016-08-23T00:18:06+5:302016-08-23T00:19:35+5:30
दप्तर दिरंगाई : आयुक्तांनी केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचे आदेश

२२३ ग्रामसेवकांना २५ हजारांचा दंड
नाशिक : जिल्ह्णात २२३ ग्रामसेवकांनी दप्तर दिरंगाई केल्यामुळे त्यासंबंधित ग्रामपंचायतींचा हिशेब सादर न केल्याने पेसाचा निधी देण्यात येणार नाही. त्यामुळे दप्तर दिरंगाई करणाऱ्या २२३ ग्रामसेवकांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावण्याची विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्णातील २२३ ग्रामसेवकांनी बदली होऊनही दप्तरच सादर न केल्याने त्यांच्यावर प्रत्येकी २५ हजार दंडाची कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हा परिषदेकडे केल्याची माहिती उपआयुक्त सुखदेव बनकर यांनी आढावा बैठकीत दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील ग्रामपंचायत विभागाचा आढावा सादर करत असताना पेसा अंतर्गत थेट ग्रामपंचायतींना वितरित केलेल्या निधीतून शेकडो कामे अपूर्ण असल्याबाबत दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हिशेब सादर न केल्याने संपूर्ण ग्रामपंचायतीलाच या बेजबाबदार ग्रामसेवकांमुळे वेठीस धरण्याची वेळ आली आहे. ही बाब गंभीर असून संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई का प्रस्तावित केली नाही, अशी विचारणाही दादा भुसे यांनी ग्रामपंचायत विभागाला केली. त्यावर उपआयुक्त सुखदेव बनकर यांनी बदली होऊनही अशा दप्तर सादर न करणाऱ्या २२३ ग्रामसेवकांवर प्रत्येकी २५ हजाराच्या दंडाची कारवाई करावी, अशी शिफारस जिल्हा परिषदेला करण्यात आल्याकडे सुखदेव बनकर यांनी लक्ष वेधले.
बदली होऊनही दप्तर सादर न करणाऱ्या आणि त्यामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरणाऱ्या ग्रामसेवकांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच येत्या १५ दिवसांत आपल्याला अहवाल सादर करावा, असे आदेश दादा भुसे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले. (प्रतिनिधी)