सिंहस्थ संपल्यावर अडीच कोटींचा निधी
By Admin | Updated: October 21, 2015 23:19 IST2015-10-21T23:18:20+5:302015-10-21T23:19:45+5:30
शासनाचे वराती मागून घोडे : आरोग्य विभागाचे कानावर हात

सिंहस्थ संपल्यावर अडीच कोटींचा निधी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा संपून महिना उलटल्यानंतर शासनाला भाविकांच्या आरोग्याची काळजी वाटली असून, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेला औषध खरेदीसाठी २ कोटी ४९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे औषध खरेदीसाठी यापूर्वीच आलेला सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने शासनाला परत केलेला आहे.
१९ आॅक्टोबर रोजी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत आरोग्य विभागामार्फत भाविकांना द्यावयाच्या आरोग्य सुविधांसाठी औषधे, लिनन व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी ४९ लाख ९९ हजारांचा निधी वितरित करण्यात येत असल्याचे पत्र विभागाचे अवरसचिव प्रकाश इंदलकर यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार २२१० व ५०४१ लेखाशीर्षाखाली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात ही औषधे खरेदी करण्यासाठी हा सुमारे अडीच कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून औषधे खरेदी करताना विहित कार्यपध्दतीचा अवलंब करावा, तसेच शासनाने नियुक्त केलेल्या खरेदी समितीने आखून दिलेल्या विहित पद्धतीनुसार खरेदी केली जावी, अर्थ व प्रशासन सहसंचालकांनी अटींची पूर्तता झाल्याची खात्री करून हे अनुदान अदा करावे, असे पत्रात म्हटले आहे. मुळातच सिंहस्थ काळात तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासनाने निधीची मागणी केल्याचे समजते. त्यावेळी आॅगस्टमध्ये सुमारे १ कोटी ८० लाखांचा निधी जिल्हा परिषदेला पाठविला होता. मात्र या निधीतून शासन नियमांच्या अधीन राहून खरेदी व खर्च करता येणे अशक्य असल्याचे पाहत हा निधी आरोग्य संचालकांकडे परत केल्याचे समजते. तसेच राज्यस्तरा वरूनच सिंहस्थासाठी तातडीची औषधे व साहित्य उपलब्ध करून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सिंहस्थ संपल्यानंतर महिनाभराने नेमका हा अडीच कोटींचा निधी शासनाने का पाठविला? याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा आहे. (प्रतिनिधी)