कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: October 11, 2015 22:46 IST2015-10-11T22:46:13+5:302015-10-11T22:46:44+5:30
संशयितांमध्ये वकिलाचा समावेश

कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक
नाशिक : बाजारभावापेक्षा कमी किमतीत एक किलो सोने देण्याचे आमिष दाखवून गत तीन महिन्यांत धुळे जिल्ह्यातील प्रमोद डेरे यांच्याकडून २५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकरोड परिसरात घडला़ या प्रकरणी सहा संशयितांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांमध्ये एका वकिलाचाही समावेश आहे़
धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथील रहिवासी प्रमोद शंकर डेरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रमोद बनसोडे, अॅड़ प्रवीण गायकवाड, जोएब खान, शहानवाझ पठाण, सुरेश भुजबळ यांसह आणखी एकजण अशा सहा जणांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत एक किलो सोने देण्याचे आमिष दाखविले़ यासाठी गत तीन महिन्यांपासून संशयितांनी डेरे यांना कधी नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात, तर कधी शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात वा इतर ठिकाणी बोलावून घेत असत़ एक किलो सोन्याचे आमिष दाखवून संशयितांनी डेरे यांच्याकडून २५ लाख रुपये (एक हजार रुपयांच्या १५००, तर पाचशे रुपयांच्या २००० नोटा) घेतले़ सदर रक्कम घेतल्यानंतर मात्र सोने देण्यास टाळाटाळ केली़ दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद डेरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून संशयितांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़ या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत़ (प्रतिनिधी)