एटीएम फोडून २४ लाखांची लूट
By Admin | Updated: August 10, 2014 02:03 IST2014-08-10T01:52:09+5:302014-08-10T02:03:05+5:30
एटीएम फोडून २४ लाखांची लूट

एटीएम फोडून २४ लाखांची लूट
सिन्नर : शहराच्या मध्यवर्ती भागातील बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी २४ लाख ४३०० रुपयांची चोरी केली. महिन्याभरात चोरट्यांनी दुसरे एटीएम मशीन फोडण्याचे धाडस केल्याने खळबळ उडाली आहे.
येथील चौदा चौक वाड्याच्या सांगळे कॉम्प्लेक्समध्ये बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले. सकाळी ९ वाजेच्या सुमारास कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात सदरची घटना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या मशीनमध्ये गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास १७ लाख रुपये टाकण्यात आले होते, तर अगोदरचे सात लाख रुपये या मशीनमध्ये शिल्लक होते अशी एकूण २४ लाख ४३०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. पोलिसांनी श्वानपथक पाचारण केले होते. तथापि, पावसामुळे श्वानाला चोरट्यांचा माग काढता आला नाही, ठसे तज्ज्ञांकडून ठसे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. (पान २ वर)
मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट अॅण्ड सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीकडून या एटीएम मशीनची देखभाल केली जाते. तर या मशीनमध्ये रक्कम टाकण्याचे काम आयएसएस एसडीबी या सिक्युरिटी प्रायव्हेट कंपनीतर्फे केले जाते. त्यामुळे बँकेचा या एटीएम मशीनशी तसा कोणताही संबंध येत नाही.
एटीएम मशीनमध्ये असणाऱ्या दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरांना चोरट्यांनी काळ्या रंगाचा चिकट टेप चिकवला होता. त्यापूर्वीचे फुटेज व आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही माहिती मिळते का, यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक के.डी. राठोड, हवालदार नितीन मंडलिक, रवींद्र वानखेडे, प्रवीण गुंजाळ तपास करीत आहेत. (वार्ताहर)