जुन्या नाशकात २४ किलो गांजा जप्त
By Admin | Updated: July 29, 2016 00:35 IST2016-07-29T00:34:30+5:302016-07-29T00:35:20+5:30
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांचे धाडसत्र

जुन्या नाशकात २४ किलो गांजा जप्त
नाशिक : जुने नाशिक परिसरात भद्रकाली पोलिसांनी गुरुवारी (दि.२८) छापेमारी करत सुमारे एक लाख ४७ हजार रुपये किमतीचा साडेचोवीस किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. पोलीसांनी शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारांविरोधात उघडलेल्या मोहिमेअंतर्गत सदर कारवाई केली. जुने नाशिकसह भद्रकाली भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी येत असल्याची चर्चा होती. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून गुन्हे शोध पथकासह तांबे यांनी खडकाळी येथील जीन मंजीलजवळील टपरीवर धाड टाकली. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांनीही तत्काळ सापळा रचला. पोलीस कुमक वाढविण्याचे आदेश देत भद्रकाली हद्दीतील जुने नाशिक भागात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. संशयित हनीफ वजीर शेख, वसीम वजीर शेख या दोघा भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजार रुपये किमतीचा एक किलो गांजा मिळून आला. यांची चौकशी केली असता हा गांजा काजीपुरा भागात राहणाऱ्या वसीम अनीस शेख व शब्बीर रमजान हुसेन यांच्याकडून काही वेळेपूर्वीच विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे शिवनेरी चौकात जाकीर हुसेन रुग्णालयाच्या शेजारी पोलीस पथकाने धाड टाकली. यावेळी वसीम व शब्बीर यांच्याकडून अठरा हजार रुपये किमतीचा तीन किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून काझीपुऱ्यातील गौरव अॅनेक्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या मोहसीन अनिस शेख उर्फ मिन्या याच्या घरावरही पोलिसांनी छापा मारला. सदनिका क्रमांक दोनची पोलिसांनी झडती घेतली असता बाल्कनीमध्ये ९६ हजार रुपये किमतीचा सोळा किलो गांजा तसेच वरील सदनिकेच्या झडतीमध्ये बेडरुममधून पलंगाखालून चार साडेचार किलो असा एकूण वीस किलो पाचशे ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. या सर्व संशयितांकडून एकूण एक लाख ४७ हजार रुपये किमतीचा एकू ण २४ किलो ५०० ग्रॅम इतका गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. (प्रतिनिधी)