टीईटीसाठी २३ हजार उमेदवारं
By Admin | Updated: January 9, 2016 23:22 IST2016-01-09T23:08:04+5:302016-01-09T23:22:30+5:30
शिक्षक पात्रता : येत्या शनिवारी दोेन सत्रांत परीक्षा

टीईटीसाठी २३ हजार उमेदवारं
नाशिक : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) जिल्ह्यातील तब्बल २३ हजार १७७ शिक्षकांनी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला असून, पुढील शनिवारी (दि.१६) ही परीक्षा दोन सत्रांत होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.
जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी ही शिक्षक पात्रता परीक्षा होणार असून, त्यासाठी ३९ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यात रचना माध्यमिक हायस्कूलमध्ये उर्दू माध्यमाची, तर यशोदाबाई डायाबाई मुलींच्या महाविद्यालयात इंग्रजी माध्यमाची परीक्षा होणार आहे. उर्वरित ३७ परीक्षा केंद्रांवर मराठी माध्यमाची परीक्षा होईल. त्यासाठी पहिल्या सकाळच्या सत्रात ५३९ खोल्यांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गशिक्षकांची परीक्षा होणार असून, त्यासाठी ५३९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या दुपारच्या सत्रात पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी ३९१ खोल्यांमध्ये ३९ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ३९१ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी १३ हजार ४२४ पात्र शिक्षक परीक्षार्थी, तर दुपारच्या सत्रात परीक्षेसाठी पात्र नऊ हजार ७५३ पात्र परीक्षार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.