सटाण्याच्या लोकअदालतमध्ये २२०० प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 17:37 IST2019-07-14T17:36:46+5:302019-07-14T17:37:33+5:30
सटाणा : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत २२४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून पक्षकार ,बँका ,ग्रामपंचायत यांच्या तडजोडीतून १ कोटी ४६ लाख ५८ हजार ४९१ रु पये वसूल करण्यात आले .

सटाण्याच्या लोकअदालतमध्ये २२०० प्रकरणे निकाली
राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन येथील तालुका विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा न्या. संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .वेळ आणि पैसा वाचविण्याबरोबरच एकमेकामधील कटू टाळण्यासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या खटल्यांमध्ये जास्तीत जास्त खटले तडजोडीने मिटविण्याचे आवाहन न्या. चव्हाण ,वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे यांनी केले होते .त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत न्यायालयात दाखल प्रकरणापैकी ९९ खटले तडजोडीने मिटविण्यात आले .यामध्ये अनेक जणांचे संसार जोडले गेले .तसेच धनादेश न वटता परत आलेल्या प्रकरणांमध्ये जे खटले दाखल झाले होते त्यामध्ये तडजोड होऊन त्या प्रकरणात ५८ लाख ७० हजार एवढी रक्कम भरून प्रकरणे मिटविण्यात आली. तसेच अनेक पोटगीचे खटले तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा अधिनियम सन २००५ मधील अनेक प्रकरणामध्ये तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली .राष्ट्रीय लोकअदालतच्या प्रचारासाठी न्यायालय व वकील संघाच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात ठिकठिकाणी कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जनजागृती होऊन लोकअदालतमध्ये चांगला प्रतिसाद मिळून खटले निकाली काढण्यास मदत मिळाली .यासाठी वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे ,चंद्रशेखर पवार ,अभिमन्यू पाटील ,नितीन चंद्रात्रे ,वसंतराव सोनवणे ,संजय सोनवणे ,रवींद्र पाटील ,रेखा शिंदे ,सुजाता पाठक ,यशवंत सोनवणे ,सोमदत्त मुंजवाडकर ,निलेश डांगरे ,प्रकाश गोसावी ,सतीश चिंधडे ,स्मिता चिंधडे ,मनीषा ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले .