देवळा : तालुक्यातील खर्डे गावात सुरू असलेले सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी २० सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, यापुढे गावात अवैध व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यास २१ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.खर्डा येथे शुक्रवारी सरपंच अर्जुन मोहोन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या आधी गावातील युवकांनी गावात सुरू असलेली गावठी दारू, मटका आदि अवैध व्यवसाय ग्रामपंचायतीने त्वरित बंद करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. गावात सुरू असलेल्या ह्या अवैध धंद्यांकडे बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याने गावातील व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढते आहे. खर्डे येथील आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या गावठाणच्या जागेत महिन्यापासून मटका सुरू आहे. जवळच माध्यमिक विद्यालय असल्याने सुटीच्या काळात विद्यार्थी मटक्याची गंमत पाहण्यासाठी जातात. याचा वाईट परिणाम शालेत विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. खर्डे गाव व शेजारील गावात एकच पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था सांभाळत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे अवैध धंद्यांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली होती. सोबत खर्डा येथे स्वतंत्र पोलीस चौकीची निर्मिती करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती.त्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा घेऊन गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गावकऱ्यांच्या एकमुखी निर्णयामुळे अवैध व्यवसाय बंद होण्याच्या आशा वाढल्या आहेत. निवेदनावर दीपक जाधव, जितेंद्र पवार, योगेश गांगुर्डे, सुभाष देवरे, प्रवीण देवरे, अमोल देवरे, योगेश पवार आदिंसह १०० ते १५० तरुणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
खर्डेत अवैध धंदे करणाऱ्यांना २१ हजार दंड
By admin | Updated: July 18, 2015 23:02 IST