वीस हजार चौरस फुटांची साकारली महारांगोळी
By Admin | Updated: March 27, 2017 00:05 IST2017-03-27T00:04:58+5:302017-03-27T00:05:21+5:30
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी गोदाकाठावर सुमारे १२५ महिलांनी अवघ्या दोन ते अडीच तासांत सुमारे वीस हजार चौरस फूट एवढ्या आकाराची महारांगोळी साकारली.

वीस हजार चौरस फुटांची साकारली महारांगोळी
नाशिक : येत्या मंगळवारी गुढीपाडव्याचा सण साजरा होणार असून, हिंदू नववर्षालाही प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी गोदाकाठावर सुमारे १२५ महिलांनी अडीच तास परिश्रम घेत अवघ्या दोन ते अडीच तासांत सुमारे वीस हजार चौरस फूट एवढ्या आकाराची महारांगोळी साकारली. रविवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता नारोशंकर मंदिराला लागून असलेल्या जुन्या भाजीबाजार पटांगणावर महारांगोळी रेखाटण्यास सुरुवात झाली होती. या उपक्रमाचे वैशिष्ट म्हणजे १२५ महिलांनी एकत्र येत आकर्षक रंगसंगतीचा खुबीने वापर करत ‘सामाजिक ऐक्य’ ही संकल्पनेवर आधारित वीस हजार चौरस फूट आकाराची (२०० बाय १०० फूट) महारांगोळी साकारली. यासाठी सुमारे ७ टन रांगोळीचा वापर करण्यात आला. या महारांगोळीमधून वारकरी सांप्रदायाचे दर्शन घडविण्यात आले. महारांगोळी साकारण्यास सुरुवात केली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत रांगोळी पूर्णत्वास आली होती. पहाटे सहा वाजेपासून उगवत्या दिनकराच्या साक्षीने यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, सिडकोच्या प्रशासक कांचन बोधले, परमहंस सद्गुरू वेणाभारती महाराज आदि उपस्थित होते. महाराजांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. दिवसभर ही महारांगोळी शहरामधील विविध व्हॉट््सअॅप ग्रुपमधून व्हायरल होत होती. अनेकांनी या महारांगोळीचे छायाचित्र ‘डीपी’ ठेवले होते. मागील वर्षीदेखील हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी १२५ बाय १०० फूट आकाराची रांगोळी साकारण्यात संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांना यश आले होते. महारांगोळी हे मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे नववर्षाच्या आरंभी सर्व समाजबांधवांना नवी ऊर्जा, नवी आशा मिळावी हा या उपक्रमांमागील उद्देश असल्याचे अध्यक्ष राजेश दरगोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अशी आहे महारांगोळीची संकल्पना
संत परंपरेमध्ये वारकरी सांप्रदायाचे अत्युच्च स्थान असल्याने सांप्रदायातील विविधता, परंपरा, सामाजिक ऐक्य, एकता, अध्यापन, विज्ञान यांचे चित्रण महारांगोळीच्या रेखाटनातून करण्यात आला होता. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकोबारायांपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी दिलेल्या जगत कल्याणाचा संदेशही या रांगोळीत देण्यात आला होता.